स्वबळाच्या ना-यामुळे कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नाही ; महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस आय कमिटी माजी सदस्य अरविद ढमढेरे यांची खंत
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.नानासाहेब पटोले नेहमीच स्वबळाचा नारा देतात पण कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नाही अशी खंत महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस आय कमिटी माजी सदस्य , शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.अरविंद ढमढेरे यांनी व्यक्त केली..
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री.ढमढेरे यांनी म्हटले आहे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.नानासाहेब पटोले नेहमीच स्वबळाचा नारा देतात पण कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नाही. मग निवडणूका कोणाच्या पाठबळावर जिंकायच्या हा प्रश्न निर्माण होतो.
महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही. निधी मिळाला तरी खर्च करण्यावर मर्यादा येतात. ते स्वतंत्र निर्णय घेवू शकत नाही असे निदर्शनास येते.
राष्ट्रवादीचा वारू सुसाट सुटलेला आहे. तो आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस सरकारमधील तळागाळातील कार्याकर्त्यांना बरोबर घेवून कार्यक्रम करत नाही. त्या लोकांना हिणकस वागणूक देतात. हे आघाडी धर्माला धरून नाही असे वाटते. हा वारू आदरणीय साहेबांनीच आकळला पाहिजे असे वाटते.
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांना कर्जमाफी करून सुखद दिलासा दिला. परंतू नंतरच्या काळात शेतीपंपांना आल्प दरात वीज ,ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या एस टी कर्मचा-यांना शासनात विलीन करून त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. ही सुद्धा आपलीच लेकरे आहेत. नुसता मुंबई पुरताच विचार करू नये असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, भाजपाचा सध्या चाललेला कार्यक्रम जनतेला द्विधा मन:स्थितीत ठेवण्याचा दिसतो. त्यांची ईडी सतत चौफेर फिरते. कोणाकडे जाते येते . पण कोणी काय काय केले .कसे कसे केले .त्यातून काय मिळाले हे स्पष्टपणे सांगत नाही. सध्या प्रसारमाध्यमांतील माहितीवरून सर्वत्र भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो. सहकारी बाबूंनी भरपूर माया जमविलेली दिसते. यात कोण बरोबर कोण चूक म्हणजेच उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे ही जनतेची संभ्रमावस्था झाल्याचे दिसते. हा लोकशाहीला लागलेला रोगच आहे असे वाटते. त्यावर लोकांनाच २०२४ मध्ये उपचार शोधावा लागेल असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस आय कमिटी माजी सदस्य , शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.अरविंद ढमढेरे यांनी म्हटले आहे.