राज्यातील नवीन सरकारचा आज शपथविधी सोहळा;
Raju tapal
December 05, 2024
16
राज्यातील नवीन सरकारचा आज शपथविधी सोहळा;
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घेणार आज शपथ..
कडक पोलीस बंदोबस्त
मुंबई:-राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४ हजार पोलिसांची फोज तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर एस.आर.पी.एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एनएसजी कमांडो कर्नल तुषार जोशी यांनी आझाद मैदान आणि परिसराला भेट दिली.
महाराष्ट्र राज्याच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळ्यानिमित्त मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी मुंबई पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस सह आयुक्त (का. व सु.) ह्यांचे देखरेखीखाली पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता मुंबई पोलीस दलाकडून सोहळ्यादरम्यान ५ अपर पोलीस आयुक्त, १५ पोलीस उप आयुक्त, २९ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह ५२० पोलीस अधिकारी आणि ३५०० पोलीस अंमलदार तसेच वाहतुक नियमनाकरिता मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून १ अपर पोलीस आयुक्त, ३ पोलीस उप आयुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० पोलीस अंमलदार असा स्वंतत्र बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
सोबतच महत्त्वाच्या ठिकाणी एस. आर. पी. एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांना त्याबाबत तात्काळ माहिती द्यावी. तसेच आवश्यक प्रसंगी नागरिकांनी तात्काळ पोलीस मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन १००, ११२ येथे संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Share This