तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. अर्जुन मुसमाडे
शिरूर :- शिक्षण प्रसार मंडळाच्या तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या पूर्णवेळ प्राचार्यपदी डॉ. अर्जुन मुसमाडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज अधिकृतपणे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. प्रभारी प्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी त्यांच्याकडे रितसर प्राचार्य पदाचा पदभार सुपूर्द केला. या निमित्ताने तळेगाव ढमढेरे महाविद्यालयामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंद दादा साहेबराव ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त प्राचार्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नवनियुक्त प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे, प्रभारी प्राचार्य डॉ. पराग चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. ज्योतीराम मोरे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, महाविद्यालयाच्या प्रथम प्रभारी प्राचार्या अनिता करपे यांसह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज नवनियुक्त प्राचार्य व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण व श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्राचार्य पदाचा पदभार ग्रहण केल्यानंतर स्वागत समारंभात बोलताना प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी महाविद्यालयामध्ये भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्राचार्यपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. मुसमाडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील महाविद्यालयामध्ये काम करत असताना विद्यार्थी हाच घटक केंद्रबिंदू मानला जाईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थाचालक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी या घटकांना सोबत घेऊन निश्चित आम्ही यशस्वी वाटचाल करू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्थेचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या वाटचालीचा विस्तृत आढावा याप्रसंगी घेतला. स्वर्गीय रायकुमार गुजर आणि साहेबरावअण्णा शंकरराव ढमढेरे यांनी दूरदृष्टी ठेवून शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची मुहूर्तमेड रोवली. त्यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या संस्थेचा विस्तार होत असताना शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील प्रत्येक घटकाला आनंद होत असल्याचेही अरविंददादा ढमढेरे यांनी याप्रसंगी सांगितले. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या वाटचालीचा विस्तृत आढावा घेतला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व ग्रामीण भागातील मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रसारक मंडळ परिवार सदैव कटिबद्ध असल्याचे महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी सांगितले. भविष्यातील वाटचालीमध्ये तळेगाव ढमढेरे व पंचक्रोशीतील विविध समाज घटकांतील पाल्यांसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महेशबापू ढमढेरे यांनी दिली. केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, डॉ. सुरेंद्र वावळे, डॉ. दिलीप मुळूक, डॉ. अर्जुन डोके, डॉ. अशोक दिवेकर, डॉ. शरद बोरुडे, डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, डॉ. नानासाहेब जावळे, डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, डॉ. राजेंद्र गायकवाड, कोपरगाव येथील प्रा. डॉ. चव्हाण, प्रा. डॉ. पगार, प्रा. गोकुळ जाधव, प्रा. अमित सोनवणे, प्रा. शुभम पठारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधीसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड, भारतीय जैन संघटना महाविद्यालयातील प्रा. डॉ. पाटील सर, एस.एस. ढमढेरे महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र भगत, रायकुमार बी. गुजर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक ओमासे सर आदी मान्यवर याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. पद्माकर गोरे यांनी या स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन तर मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे यांनी आभार मानले.