तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करू नये ; ग्रामस्थांची मागणी
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे खाजगी जागेत स्थलांतर करू नये अशी मागणी तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायत मालकीच्या जागेत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय पार्किंग,प्रशस्त जागा, इतर सुविधा नसल्याच्या कारणावरून दुसरीकडे खाजगी जागेत स्थलांतर होणार असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करू नये या मागणीसाठी शनिवारी ग्रामस्थांनी सभा घेवून तीव्र विरोध केला.
बाजार समितीचे माजी सभापती अरविददादा ढमढेरे यांनी याविषयी मत व्यक्त करून स्थलांतराला विरोध केला.
महेंद्र पवार, महेशबापू ढमढेरे, महेश भुजबळ, ऍड दिपक ढमढेरे, सुनिल ढमढेरे, चेतना ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे,श्रीकांत ढमढेरे, ऍड. सुरेश भुजबळ, कैलास नर्के,नवनाथ कांबळे आदी पदाधिका-यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
दुय्यम निबंधक कार्यालयामुळे ग्रामपंचायतीला मासिक उत्पन्न मिळत असून दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात व्यापारी,मुद्रांक विक्रेते, इतर लहान मोठे व्यावसायिक, व्यवसाय करत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात बसस्थानक, ग्रामपंचायत कार्यालय ,पोलीस दुरक्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्र ,शाळा,पार्किंग आदी सुविधा आहेत. कार्यालय स्थलांतरामुळे ग्रामस्थ व व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.