वेळापत्रकाविना शिक्षक बदली पोर्टल सुरू
रिक्त जागांची घोषणाही नाही; शिक्षकांत संभ्रमावस्था
अमरावती ता.९ :- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. जिल्हा परिषदेतर्फे कोणत्याही सूचना नाहीत. बदलीसाठी रिक्त जागांची घोषणाही केलेली नाही अन् थेट बदली पोर्टल सुरू केले आहे.
संवर्ग एक व दोनमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी बदलीतून सूट हवी आहे का, याबाबतचे होकार व नकार भरण्याच्या सूचना बदली पोर्टलवर शनिवारी सायंकाळी जाहीर केल्या आहेत. रविवारअखेर ही मुदत देण्यात आली आहे. प्रशासनाचे स्पष्ट आदेश व बदली वेळापत्रक अधिकृत जाहीर न झाल्याने शिक्षक वर्ग कमालीचा गोंधळला आहे. शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस शासकीय सुटीचे आहेत. त्यामुळे विचारणा कोणाला करावयाची, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.पुन्हा आज एक दिवस मुदत वाढ दिली आहे.
संवर्ग एक व दोन चे फार्म भरतांना ओटीपी व ई-मेलवर पिंट न येणे हया अडचणी आल्यात त्या दुर होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी शासनाने शिक्षकांचे चार संवर्ग तयार केले आहेत. या चार संवर्गांनुसार व बदलीच्या सात टप्प्यांचे २८ एप्रिल ते ३१ मे पर्यंतचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आंतरजिल्हा आपसी बदली झालेल्या काही शिक्षकांनी आॅनलाइन बदलीसाठी सेवाज्येष्ठता धरावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय १५ मार्च २०२४ च्या नवीन संचमान्यता आदेशाविरोधात अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. १६ जूनपर्यंत संचमान्यतेबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या सर्व कारणांमुळे वेळापत्रकानुसार ३१ मे पूर्वी होणारी बदली प्रक्रिया जून सुरू झाला तरी प्रत्यक्षात सुरू झाली नाही.
आॅनलाइन बदली प्रक्रियेनुसार बदलीपात्र, बदली अधिकारपात्र व सेवाज्येष्ठ शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर समानीकरणासाठी रिक्त पदे ठेवून बदलीसाठी निव्वळ रिक्त जागा घोषित कराव्या लागतात. ही यादी घोषित करण्यापूर्वीच संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांना बदलीसाठी होकार व नकार देणे बदली पोर्टलवर अचानक घोषित केल्याने शिक्षक वर्ग पुरता गोंधळला आहे. संवर्ग एक व दोनमधील बदलीइच्छुक शिक्षकांची यादी जाहीर करण्यासाठी व यादीतील शिक्षकांवर काही आक्षेप असतील तर ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे अर्ज भरून घेतले जात असावेत, असे शिक्षक शैलेन्द्र दहातोंडे यांनी सांगितले.
शासनाने बदलीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. रिक्त पदांची व समानिकरणाची यादी घोषित केलेली नाही आणि थेट बदली पोर्टल सुरू केल्याने शिक्षक पुरता गोंधळला आहे. शासनाने बदलीचे वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे.
राजेश सावरकर,(राज्य प्रसिध्दी प्रमुख
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)
=====================