• Total Visitor ( 435779 )

उत्तरपत्रिका शाळेतच तपासणीचे शिक्षकांना बंधन

Raju tapal March 17, 2025 103

दहावी-बारावीचा निकाल १५ मेपूर्वी;

उत्तरपत्रिका शाळेतच तपासणीचे शिक्षकांना बंधन;

उत्तरपत्रिका जळालेल्या 'त्या' १७५ विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण



मुंबई :- इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहेत. परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील १५ मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे.त्याअनुषंगाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत.



दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांबरोबरच पर्यवेक्षकांसाठी देखील सरमिसळ पद्धत अवलंबली. पण, त्याचा फार प्रभाव दिसला नाही. या परीक्षेत भरारी पथकांनी नऊ विभागीय मंडळांतर्गत २०० हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांचा एक पेपर बाकी आहेत. १७ मार्च रोजी परीक्षा संपणार आहे.तत्पूर्वी, ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान ३५ उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.



उत्तरपत्रिका जळाल्याने 'त्या' विद्यार्थ्यांना सरासरी गुण



विरार पश्चिम भागातील एका शिक्षिकेच्या घराला आग लागून बारावीतील वाणिज्य शाखेच्या १७५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (ओसी) या विषयाच्या त्या उत्तरपत्रिका होत्या. बोर्डाच्या नियमांनुसार उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना अन्य विषयांमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवरून त्या विषयासाठी गुण दिले जाणार आहेत. उत्तरपत्रिका शाळेच्या वेळेत शाळेतच तपासण्याचा नियम आहे, पण त्याचे पालन होत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी असे काही प्रकार घडतात, त्यावेळी त्या शाळेच्या मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकावर कारवाई केली जाते.



विद्यार्थ्यांची संख्या अन्‌ उत्तरपत्रिका तपासणी



इयत्ता दहावीचे परीक्षार्थी



१६ लाख



उत्तरपत्रिकांची तपासणी



४४ टक्के



इयत्ता बारावीचे परीक्षार्थी



१५ लाख



उत्तरपत्रिकांची तपासणी



३९ टक्के



निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन



बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका घरी न घेऊन जाता शाळेच्या वेळेत त्या शाळेतच तपासणे अपेक्षित आहे. उत्तरपत्रिका घरी नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशीअंती संबंधित शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाते. दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरपत्रिकांची तपासणी गतीने सुरू असून दोन्ही इयत्तांचे निकाल १५ मेपर्यंत जाहीर होतील, असे नियोजन आहे.

औदुंबर उकिरडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement