शिक्षकांचे ५ डिसेंबरला शाळा बंद आंदोलन. १००% शाळा बंद ठेवण्याचा निर्धार
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार सर्व प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा. शिक्षक पात्रता परीक्षा (TET ) संबंधाने शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा,संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा या व इतर मागण्यांबाबत अनेकदा शासनाकडे पत्रव्यवहार,संबंधित मंत्री महोदयांसमवेत बैठका घेण्यात आल्या पण कोणताही अनुकूल प्रतिसाद शासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात आगामी ५ डिसेंबरला शाळा बंद आंदोलन व प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्याचे नियोजन सर्व संघटनांनी एकत्र येऊन केलेले आहे व तशी नोटीस शासनास दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा समन्वय ची सहविचार सभा रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ ला जलसंपदा पतसंस्था कार्यालय, वर्धा येथे संपन्न झाली.वर्धा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी एकजुटीने सदर आंदोलनात सहभाग नोंदवून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे व ५ डिसेंबरला वर्धा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे सदर सभेत ठरवले आहे. सभेला जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य,जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे,जिल्हाध्यक्ष अजय बोबडे,सरचिटणीस श्रीकांत अहेरराव,चंद्रशेखर ठाकरे,श्रीकांत केंडे,पवन बानोकार यांची सभेला उपस्थिती होती