शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवावेत !
महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड
विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवून शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवावेत म्हणजेच चांगले नागरिक घडतील असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनी आज केले. महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजिलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना संस्कार देताना, शिकवताना आपली व्हॅल्यू सिस्टीम विसरु नये, प्रत्येक मुलाकडे टॅलेंट हे असतंच, पण या मुलांना योग्य संधी मिळण्यासाठी शिक्षकांनी आणि शाळेने देखील प्रयत्न करावेत असे त्या पुढे म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, प्रशासन अधिकारी रमेश पाटील, महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, विनोबा भावे ॲपचे डायरेक्टर संजय दालमिया तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर हे उपस्थित होते.
शिक्षक हेच मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात, उद्याच्या भारताचा आधारस्तंभ असलेल्या मुलांना घडविण्याचे काम शिक्षकांचेच आहे,सरकारी शाळांची यंत्रणा मजबूत आणि सक्षम होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन विनोबा भावे ॲपचे डायरेक्टर संजय दालमिया यांनी या कार्यक्रमात केले.
महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिक्षण विभागाचा कायापालट करण्याचा संकल्प केला आणि आता तो सत्यात उतरत आहे .महापालिका शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी आम्ही आता बालवाड्यांचे बळकटीकरण करीत आहोत अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात महापालिका शाळांमधील सहशिक्षक संतोष कोलेकर,सपना पाटील राजेंदर कौर तर खाजगी शाळांमधील सहशिक्षक जोशना पाटील,अपर्णा हर्षे,रुचिरा दळवी यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह स्वरूपात आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे अपेक्षा थोरात, व लिना भंडारी या महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मनपा शाळा क्रमांक 12 उंबर्डे आणि प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक साहित्याबाबत व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्या विजेत्या पंधरा शिक्षकांना यावेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.