• Total Visitor ( 430965 )
News photo

मुंबईत ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा

Raju tapal July 05, 2025 65

मुंबईत ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा;

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तोफ एकाच मंचावरून धडाडणार 



ठाकरे बंधुंचे टिकेचे बाण कुणावर? उत्सुकता शिगेला 



मुंबई :- संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्याचा दारूगोळा या ठाकरी तोफेत भरला गेला आणि सरकारला टोकाचा विरोध झाला. ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलनाची हाकही दिली होती. अखेर सरकारला जीआर मागेही घ्यावा लागला. त्यानंतर आता ठाकरे बंधू विजयी मेळावा घेत आहेत. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधूंची सरकारवर तोफ धडाडणार हे निश्चित आहे.



आजच्या विजयी मेळाव्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह नको, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. या मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू द्या,असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. मात्र,या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन जीआर रद्द केले होते. हेच जीआर रद्द करण्यासाठी ठाकरे बंधूंनी 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, जीआर रद्द झाल्याने या मोर्चाचे प्रयोजन संपले होते. तरीही एकत्र येण्याची ओढ लागलेल्या ठाकरे बंधूंनी मोर्चा नाही तर मग विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले होते.



या विजयी मेळाव्याला महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. परंतु, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता मविआतील पक्षांकडूनही या विजयी मेळाव्याच्या केंद्रस्थानी राज आणि उद्धव ठाकरेच राहतील, असे निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू सरकारवर कोणता निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्याने आता ही टीका आणखी प्रखर होणार हेही नव्याने सांगण्याची गरज नाही. सुशील केडीयांच्या मुजोर वक्तव्यानं या टीकेला आणखी धार येणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील. दरम्यान, या विजयी रॅलीत कोणकोणते नेते भाषण करणार आहेत, याबाबतची माहिती मिळाली आहे. आजच्या विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement