• Total Visitor ( 134442 )

महाडमध्ये ठाकरे गटाला खिंडार; स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश 

Raju tapal March 28, 2025 10

महाडमध्ये ठाकरे गटाला खिंडार; स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश 

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला, आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार आहे, असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी केले.

उबाठा गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय.

पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो, हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदाताई म्हात्रे असे नेते घडवले, याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले.

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही, असं स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करु या असे आवाहन अजित पवार यांनी केलंय. नुसत्या भाषणांनी पक्ष वाढणार नाही, त्या भाषणातून फक्त विचार घेता येतात. लोकांपर्यंत जाऊन काम करायला हवे, असे सांगतानाच तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी आज प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांना दिला. महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी येत्या काही दिवसात अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यात एक वलय निर्माण करण्यात माणिकराव जगताप हे यशस्वी झाले आहेत. महाड – पोलादपूर इथल्या जनतेने त्यांच्यावर भरपूर प्रेम केले आहे. माझ्या लोकसभा निवडणुकीत स्नेहल जगताप हिने मला मदत केली नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत माझी मदत स्नेहल जगताप यांना झाली नाही, हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर लोककल्याणकारी कामे आपण करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराने आज अनेक लोक पक्षासोबत जोडली जात आहेत. सामाजिक समतेचा हुंकार ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या भूमीत काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुमच्या पाठीशी उभी केली जाईल, असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघात 92 हजार मते मिळाली परंतु मला विजयापर्यंत जाता आले नाही. मात्र, ज्यांनी संधी दिली आणि ज्यांनी विरोधात काम केले त्यांचे आभार महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मानले. तळा, म्हसळा या तालुक्यांचा विकास ज्यापध्दतीने केला जात आहे त्याचपध्दतीने महाड – पोलादपूरचा विकासही तटकरेसाहेबांनी करावा, अशी अपेक्षा स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी माझे वडील पक्षाचे सदस्य होते. आज मला या कुटुंबात परत आल्याचे समाधान वाटत असल्याचे स्नेहल जगताप म्हणाल्या.

 

Share This

titwala-news

Advertisement