‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का…’, कुंभमेळ्याच्या स्नानावरून केलेल्या टीकेवर ठाकरेंचा शिंदेंना पलटवार
हिंदुत्व करणारे नेते कुंभमेळ्यामध्ये का गेले नाहीत? अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केल्याचे पाहायला मिळत आहे. तर कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या आरोप प्रत्यारोपाच्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील उडी घेतली आणि एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणं हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अवमान असल्याचे फडणवीस म्हणाले. हिंदुत्वावर बोलणारे कुभंमेळ्यात का गेले नाहीत? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर ठाकरेंकडून पलटवार करण्यात आला. ‘मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग काय त्याचा? डुबकी मारून आलात म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे कितीही डुबक्या मारा’, असं खोचक भाष्य करत ठाकरेंनी शिंदें यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ठाकरे आणि शिंदेंच्या आरोप-प्रत्यारोपात फडणवीस यांनी भाष्य केले. ‘उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात. रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तेवढा वेळ माझ्याकडे नाही. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना वोट केलंय. हा तर महाराष्ट्रातील जनतेच अपमान आहे. त्याला तुम्ही गद्दार म्हणताय मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं म्हणत त्यांनी ठाकरेंना सल्ला दिला आहे.