'त्या' दोन नराधम शिक्षकांना 10 पर्यंत पोलिस कोठडी
Raju Tapal
April 09, 2023
130
'त्या' दोन नराधम शिक्षकांना 10 पर्यंत पोलिस कोठडी
अकोला :-जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील धामणदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील 4 मुलींवर अत्याचार करणार्या सुधाकर ढगे आणि राजेश तायडे या दोन नराधम शिक्षकांना सोमवार, 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.दरम्यान, या दोघांनाही शाळेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
धामणदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या चौथ्या वर्गातील चार विद्यार्थिनींवर सुधाकर ढगे आणि राजेश तायडे 2 शिक्षकांनी अनेकदा शारीरिक अत्याचार केलेत. ही बाब मंगळवार, 4 एप्रिल रोजी उघड झाल्यावर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला या कृत्याने काळिमा फासल्याने आता मुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे काय, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, येथील या खळबळजनक प्रकरणी जिल्हा परिषदेतील अधिकार्यांनी गांभीर्य दाखवून त्या दोन नराधम शिक्षकांना सेवेतून बडतर्फ केले. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, शिक्षण सभापती माया नाईक यांनी घटनेनंतर गावात जाऊन संबंधितांची भेट घेतली. पालकांची आणि मुलींची विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. त्यानंतर बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. दरम्यान, या प्रकरणी मुलींच्या पालकांनी बुधवार, 5 एप्रिल रोजीच बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत. त्या प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने तसेच महिला बाल कल्याण समितीनेही प्रयत्न केले पाहिजे. तसेच जिल्ह्यात जि. प.च्या किती शाळांमध्ये सखी सावित्री समित्या तयार केल्या आहेत त्यांची माहिती जि. प. अध्यक्षांनी घेऊन जेथे ही समिती नसेल तेथे तातडीने अशी समिती स्थापन करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान,याप्रकरणी जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना यांनी अद्यापपर्यंत कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे दिसून येते. तर शिक्षक आमदारांनी याप्रकरणी विद्यार्थीहित समोर ठेवून भूमिका घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणार्या या दोन्ही शिक्षकांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जनसामान्यांमधून केली जात आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरांवर सखी सावित्री समितीचे गठन करण्याचे आदेश शासनाने 10 मार्च 2022 रोजी दिले आहेत. याप्रकरणी शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता असे जि. प. अध्यक्षा संगीता अढाऊ यांनी सांगितले.
Share This