वाडेबोल्हाई येथील प्रसिद्ध बोल्हाई देवी
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील बोल्हाई देवी अतिशय प्रसिद्ध देवस्थान असून नवरात्रौत्सवात बोल्हाईदेवीच्या दर्शनासाठी महिला तसेच भाविकांची गर्दी होत असते.
बोल्हाईदेवी हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील जागृत प्रसिद्ध देवस्थान वाडेबोल्हाई येथे असून महाराष्ट्रातील सर्व भक्तगण देवीच्या दर्शनाला येत असतात. अश्विन महिन्याच्या रविवारी देवीची यात्रा भरविली जाते. बोल्हाई देवीचे मंदीर वाघोली - राहू रस्त्यावरील वाडेबोल्हाई येथे आहे. हवेली तालुक्यातील डोंगरगाव,पेरणे, पिंपरी सांडस, अष्टापूर, भवरापूर, कोरेगाव मूळ,उरूळी कांचन, शिंदेवाडी, न्हावी सांडस, केसनंद,लोणीकंद,वढू खुर्द दौंड तालुक्यातील पाठेठाण,राहू, पिंपळगाव,शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, सणसवाडी,वढू बुद्रुक,वाजेवाडी, आपटी, धामारी,पाबळ, जातेगाव खूर्द, जातेगाव बुद्रूक,करंदी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, गणेश मळा,केवटेमळा, विठ्ठलवाडी, दरेकरवाडी, वाबळेवाडी,पिंपळे धुमाळ मुखई,कासारी, कवठीमळा, कोंढापूरी या गावांतील तसेच परिसरातील भाविक, भक्तगण,महिला बोल्हाई देवीच्या दर्शनासाठी वाडेबोल्हाई येथे जात असतात.
बोल्हाई देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते, ही देवी ज्यांना असते त्यांना बोकडाचे मटण चालत नाही. मंदीराच्या आवारात पांडवकालीन तळे असून यात हातपाय धुतल्यानंतर त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे.चु कून एखाद्याने बोकडाचे मटण खाल्ले तर हातापायावर चट्टे उठतात.मनोभावे माफी मागितल्यानंतरच हातापायावरील चट्टे दूर होतात. बोल्हाई देवी पार्वती मातेचा अवतार समजली जाते. त्यामुळे बोकडाचे मटण निषिद्ध मानले जाते. बोकडाचे मटण ज्या भांड्यात केले असेल ते भांडे वापरत नाही बोल्हाई देवीचा ओलांडा याठिकाणी असतो. यामध्ये रविवारी मुख्य मंदिरापासून बोल्हाई देवीचे माहेरघर असलेल्या डोंगरावरील मंदीराकडे पुजारी वाजतगाजत जातात. त्यावेळी आरती घेवून पुजा-यांनी आपल्याला ओलांडून जावे अशी प्रथा असते दोन्ही बाजूंनी भाविक भक्तगण लोटांगण घालतात त्यावेळी पुजारी ओलांडून जातात याला देवीचा ओलांडा म्हणतात.
देवीला बोकडाचे मटण चालत नाही त्यामुळे भक्तगणांना बोकडाचे मटण चालत नाही असेही सांगितले जात आहे.