दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज,
कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची गरज;
सुनंदा पवार यांचं मोठं विधान
मूठ घट्ट असली की ताकद रहाते, आपण जर विखुरलेले राहू तर ताकद राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे. कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबद्दल निर्णय घ्यायला हवा. नवे उमदे जे आमदार निवडून आले आहे, त्यांना जर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष लवकर उभारू शकतो. सुनंदा पवार म्हणाल्या की, अजित पवारांनी काल जी शरद पवार यांची भेट दिली ती राजकीय नाही तर कौटुंबिक होती. हा केवळ कौटुंबिक प्रसंग आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने ही भेट झाली ते नेहमीच होते, असे मला वाटते. ते केवळ शुभेच्छा देत आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आले होते. सुनंदा पवार म्हणाल्या की, अजितदादा काही बोलले कुणाला भेटले, कुठे गेले तर त्यांची बातमी होते. पण मला त्या भेटीत बातमी सारखे काही वाटत नाही. कुटुंबामध्ये मतभेद असतात, सर्वच कुटुंबामध्ये मतभेद असतात.
मतभेद संपवून पुढे एकत्र येतील असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांनी 60 वर्षे राजकारण केले आहे. त्यांनी काय करावे यावर मी बोलू शकणार नाही. सुनंदा पवार म्हणाल्या की, जे तरुण आमदार निवडून आले आहे, त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली पाहिजे. त्यांना पक्षात जबाबदारी दिली तर हा पुन्हा चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. नव्या चेहऱ्यांना जर संधी दिली तर लवकर पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी फायदा होईल. रोहित पवारांना काय संधी द्यायची हे सर्व शरद पवारांचा निर्णय आहे. रोहित पवारांना पक्षात संधी मिळायला हवी का? असा प्रश्न विचारला असता सुनंदा पवार म्हणाल्या की, फक्त रोहित पवारच नाही तर इतरही जे तरूण नेते पक्षात आहेत, त्यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी द्यायला हवी. यामुळे पक्ष आणखी चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो.
रोहितसह आणखीही तरूण आमदार निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या. सुनंदा पवार यांच्या प्रतिक्रियेला अजित पवार गटाकडून लगेच उत्तर मिळाले आहे. विधानपरिषेदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे. पण त्यासाठी थोडा उशीरच झाला. षण्मुखानंद येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी हीच भूमिका काही काळापूर्वी मांडली होती. आता या प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात ४१ आमदार निवडून आले आहेत. एक लोकसभा तर दोन राज्यसभेचे खासदार आहेत. अशावेळेस ‘देर आये पर दुरूस्त आये’ असे म्हणून त्यांना एकत्र यायचे असेल तर त्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून एकत्र यावे.