महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या
भिवंडी तालुक्यातील कुंदे गावातील घटना
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही विजेचा चोरटा वापर करणाऱ्याविरुद्ध कारवाई करताना महावितरणच्या पथकाला मारहाण व शिवीगाळ करण्याची घटना भिवंडी तालुक्यातील कुंदे गावात शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दिनेश नामदेव होगे, नरेश आगिवले, तुकाराम आगिवले, शरद पाटील (राहणार कुंदे, ता. भिवंडी) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली आंबाडी शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता उद्देश बेलसरे, जनमित्र व सुरक्षा रक्षकांचे पथक शुक्रवारी सकाळपासून कुंदे गावात वसुली व वीजचोरी शोध मोहिम राबवत होते. यात दिनेश होगे याच्या घरात थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करून मीटर काढलेले असतानाही विजेचा चोरटा वापर आढळून आला. कार्यवाहीचे सोपस्कार पूर्ण करून पथक इतरत्र जात असताना आरोपींनी पथकाला शिवीगाळ करत कामात अडथळा आणला. पथकातील जनमित्र महेश राजपुत यांच्या हातातील मोबाईल हिसकावून त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेबाबत उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेशपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
या घटनेनंतर न डगमगता पथकाला बळ देत कटकवार यांनी शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेत कुंदे गावात शुक्रवारी १३ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर शनिवारी (०१ मार्च) पुन्हा पोलीस संरक्षणात शोध मोहिम राबवत पथकाने आणखी पाच वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई केली. मार्च अखेरच्या पार्श्वभूमिवर वीजबिल थकबाकीची वसुली अन्यथा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.