टिटवाळ्यात चक्क बॅनर्स ची चोरी.....
Raju Tapal
April 03, 2022
35
टिटवाळ्यात चक्क बॅनर्स ची चोरी.....
चोर चोर बॅनर चोर कोण
एकीकडे संपूर्ण देशामध्ये सर्व सामन्यांचे महागाईने कंबरडे मोडलेले आहे. घरगुती गॅस , किराणा,भाजीपाला याच बरोबर पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे संपूर्ण देशभर जनतेमध्ये महागाईमुळे केंद्रसरकार विरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. या असंतोषाला वाट करुन देण्याच्या उद्देशाने आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी मांडा टिटवाळा महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या विरोधात येत्या ३ एप्रील रोजी आंदोलन करण्याचे ठरवले होते. तसेच त्याबाबतचे बॅनरही निरनिराळ्या ठिकाणी लावण्यात आले. असाच बॅनर २७ मार्च रोजी महाविकास आघाडीने रिजन्सी सर्वम प्रवेश द्वाराजवळ मोठा बॅनर लावून मांडा- टिटवाळ्यातील जनतेला महागाई विरोधातील प्रस्तावीत ३ एप्रीलच्या आंदोलनाची माहिती दिली. या बॅनर मुळे दोन दिवस टिटवाळा परिसरात महागाईवर चर्चाही झडु लागल्या होत्या. पण अज्ञात भुरट्या बॅनर चोरांना या महागाई विरोधातल्या बॅनरचाच मोह झाला, बॅनरवर असलेले सिलेंडर, तुरदाळ, पेट्रोल हे खरेच की काय असं वाटलं असावं. महागाईने त्रस्त असलेल्या चोरांनी ३० मार्च रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास हा आंदोलनाचा बॅनरच पळवला... पोलिसांच्या CCTV मध्ये या बॅनर चोरांची चोरीही कैद झाली, या अज्ञात बॅनर चोरांनी चोरी नंतर बॅनरची व्यवस्थित घडी घातली, कुणी बघू नये - ओळखु नये म्हणुन बॅनर असा घडी घातला की बॅनरवरचे सिलेंडर, डाळी आणि पेट्रोलही कुणाच्या नजरेस पडू नये. केंद्र सरकारच्या विरोधातल्या आंदोलनाचे बॅनर चोर कोण असा प्रश्न आता विचारला जातोय.
या बॅनर चोरी झाल्याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांना महाविकास आघाडीने निवेदन व तक्रारही दाखल केली आहे. संबंधित तक्रारीची दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले, यावेळी महाविकास आघाडीचे स्थानिक नेते शिवसेना विभाग प्रमुख श्रीधर (दादा) खिस्मतराव, युवासेना सहसचिव व उपशहर संघटक ॲड.जयेश वाणी, युवासेना संघटक प्रवीण भोईर ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागीय अध्यक्ष मोरेश्वर (आण्णा) तरे, भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेस वॅार्ड अध्यक्ष राजेश दिक्षीत, ज्येष्ठ शिवसैनिक रिक्षा युनियन अध्यक्ष बाळा भोईर, बल्याणी शाखाप्रमुख नजीफभाई रईस, शिवसैनिक संतोष पवार याच बरोबर महा विकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. केडीएमसीच्या निवडणुका काही महिन्यांनी तोंडावर आलेल्या असतांना राजकीय पक्षाचे बॅनर चोरी झाल्याने निवडणुकीच्या आधीच कुणाला या बॅनर मुळे भिती वाटली असावी असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. निदान बॅनर चोरीच्या माध्यमातून का होईना पण आताच निवडणुकीचा गंध वाहू लागल्याची जोरात चर्चा सुरू आहे.
Share This