टिटवाळ्यातील रस्त्याला डंपिंगचे स्वरूप
एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी त्यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसर नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुंदर व्हावा यासाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात कायापालट अभियान राबवित आहेत मात्र अ प्रभागातील अनेक वॉर्डात अनेक ठिकाणी कचऱ्याची समस्या आ वासून उभीच असल्याचे दिसून येत आहे. परिसरात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत असल्याने आयुक्त्यांच्या संकल्पना इथे कचऱ्यातच पडलेल्या दिसून येत आहे असे म्हटले तर वावगं ठरू नये.
टिटवाळ्यातील स्व.आनंद दिघे मार्ग ते निमकर नाका या रस्त्यावरील चार्म्स हाईटकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल ५ ते ६ गाड्या दररोज संपूर्ण भरलेला कचरा गाड्या उभ्या करून ठेवलेल्या दिसतात. तसेच तिथे मोठ्या प्रमाणात कचरा हि साठलेला नेहमीच पाहावयास मिळतो. त्यामुळे त्या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसते. तेथून मोठ्या प्रमाणात रहिवाश्यांची रहदारी असून तेथून नाक मुठीत धरूनच नागरिकांना चालावे लागते. एकीकडे स्वच भारत अभियानाचे गीत लावून कचरा गाड्या मोठ्या ऐटीत मिरवल्या जातात मात्र तो कचरा टिटवाळ्यातच डंप करून ठेवत असल्याने टिटवाळा परिसरात सर्वत्र कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. तरी या कचऱ्यापासून परिसरातील नागरिकांची सुटका कशी करता येईल याबाबत महापालिका आयुक्तांनी याची दखल घ्यावी असे नागरिकांतून बोलले जाते.
याबाबत मांडा टिटवाळा आरोग्य निरीक्षक अक्षय कराळे यांच्याकडे विचारणा केली असता डंपिंगला गेलेल्या मोठ्या गाड्या येऊ न शकल्याने येथे कचरा साठून असल्याचे सांगितले.