• Total Visitor ( 430358 )
News photo

बेताल वाहतुकीला वेसन; आरटीओ’च्या वाहनांवर आता ‘रडार’प्रणाली

Raju tapal August 21, 2025 49

बेताल वाहतुकीला वेसन...

आरटीओ’च्या वाहनांवर आता ‘रडार’प्रणाली



राज्यभरातील आरटीओ कार्यालयांकडील वाहनांवर आता ‘रडार’प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे बेताल वाहतुकीला लगाम लागणार आहे.



वाहन चालविताना जर वाहतूक नियम मोडला तर अवघ्या काही सेंकदात तुम्हाला ई-चलान येईल’, कारण आरटीओ कार्यालय आता ‘रडार’ प्रणालीच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. त्यासाठी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना काही महिन्यांपूर्वी नवीन इंटरसेप्टर वाहन देण्यात आले आहे. या वाहनांमध्ये स्पीडगनची सुविधा आहे.आता याच वाहनांवर रडार सिस्टिम बसविण्यात येणार आहे. यात रडार सिस्टिमसह अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांचे छायाचित्र घेणे यामुळे सोपे झाले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने (एमएमव्हीडी) एकाच वेळी अनेक वाहतूक उल्लंघने शोधण्यास सक्षम रडार सिस्टीमने सुसज्ज इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्याची योजना जाहीर केली होती. रडारने सुसज्ज असलेली ही इंटरसेप्टर वाहने भारतातील अशा प्रकारची पहिलीच वाहने आहेत.



प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या फ्लाइंग स्क्वॉडद्वारे जारी केलेल्या ई-चलानच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अंमलबजावणीची कार्यक्षमता सुधारेल. राज्यभरात आता महिंद्रा-निर्मित इंटरसेप्टर वाहने आधीच पोहोचली असून नवीन प्रणाली बसवण्याच्या प्रतीक्षा संपली आहे आता बेताल वाहतुकीला लगाम लावण्यासाठी सदर वाहने सुसज्ज असल्याचे परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.



सध्या १५-२० ई-चलान



सध्या वापरात असलेल्या स्पीड गन प्रणालीद्वारे तासाला १५-२० ई-चालान जारी होतात. मात्र, नव्या रडार प्रणालीमुळे तासाला ७०० ते ८०० ई-चालान तयार करता येणार आहेत. तेही वाहनांना थांबवण्याची गरज न पडता, त्यांच्या वेगासह फोटो कॅप्चर करून नियमभंग नोंदवला जाईल.



५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद



ही रडार प्रणाली ५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद घेणार आहे. वाहनाचा वेग किती आहे, चालकाने सीट बेल्ड लावलेला आहे का, वाहन धोकादायक पद्धतीने चालविले जात आहे का, आदींची पडताळणी करून काही सेकंदात दंडाचे ई-चलान वाहनधारकाला पाठविले जाणार आहे.



एका कार्यालयाला किमान एक वाहन



राज्यातील एका आरटीओ कार्यालयातील किमान एका वाहनावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाअंतर्गंत असलेल्या वाहनांवर ‘रडार’ बसविण्याचे काम सुरू झाले आहे.



मराठवाड्यातील १७ वाहनांवर यंत्रणा



मराठवाड्यातील आरटीओ कार्यालयांच्या एकूण १७ वाहनांवर ही ‘रडार’ प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रणाली बसविण्यासाठी एका वाहनाला ६ तास लागतात. त्यानुसार आगामी काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement