ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे युवक जागीच ठार ;
Raju Tapal
October 24, 2021
48
ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे युवक जागीच ठार ; डामेर साटमवाडी येथील वळणावरील घटना
समोरून येणा-या भरधाव वेगातील ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघेजण जागीच ठार झाले.
विशाल गजानन चव्हाण वय -22 ,सुरज रमेश चव्हाण वय -19 दोघेही रा. तिवरे चव्हाणवाडी अशी अपघातात ठार झालेल्या दोघा युवकांची नावे आहेत.
तिवरे चव्हाणवाडीतील दोघे युवक विशाल व सुरज हे आपल्या ताब्यातील एम एच 07 -7043 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून तिवरे येथे येत होते. ते दोघे फोंडाघाट येथे गेले होते.
डामेर साटमवाडी येथील एका तीव्र वळणावर ट्रक क्रमांक एम एच 04- डी डी 0257 तिवरे ते फोंडा असा जात होता. ट्रकचा भरधाव वेग असल्याने मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात जोरात धडक झाली. तीव्र वळण आणि रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे यामुळे दोन्ही वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज आला नाही. वळणावर ट्रक आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ट्रकवर आदळून विशाल आणि सुरज हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. अपघातानंतर ट्रकचालक संतोष हनुमंत चव्हाण याने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मयत विशाल हा एका फायनान्स कंपनीत कामाला होता. सुरज हा यंदा पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता असे समजते.
कणकवली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.
Share This