ट्रॅक्टरची रिकामी ट्रॉली पलटी झाल्याने १२ ऊसतोड जखमी
Raju Tapal
December 09, 2021
139
ट्रॅक्टरची रिकामी ट्रॉली पलटी झाल्याने १२ ऊसतोड जखमी ; इंदापूर बाह्यवळण मार्गावर अपघात
इंदापूर शहर बाह्यवळण मार्गावर ट्रॅक्टरची रिकामी ट्रॉली पलटी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले.
जखमींमध्ये बीड जिल्ह्यातील ५ ऊसतोड कामगार असून अपघातात ऊसतोड कामगारांच्या ७ मुलांचा समावेश आहे.
मयुरी विठ्ठल मोरे वय - ६, लखन गायकवाड वय - ८, विवेक गायकवाड वय - ६ कविता गंगाराम पवार वय - ६, सीमा संजय पवार वय - १८, रेश्मा सुनील सपकाळ वय - ३०, अनिकेत पांडूरंग गायकवाड वय - १०, आरती लखन गायकवाड वय - १२, जोष्णा विठ्ठल माटे वय - २६, जनाबाई लखन गायकवाड वय - २६, आशा गंगाराम पवार वय - ६० सर्वजण रा.बीड जिल्हा अशी जखमींची नावे असून बुधवार दि.८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला.
ट्रॅक्टरचालक परांडा येथील असून त्याचे नाव समजू शकले नाही.
ट्रॅक्टरचालक ऊसाचा मोकळा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यासह घेवून पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने चालला होता. कुत्रे आडवे आल्याने ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रॉली पलटी होवून ट्रॉलीत बसलेले सर्वजण जखमी झाले.
अंबड औद्योगिक वसाहतीत एक्स लो पॉईंट येथे झालेल्या दुस-या अपघातात आयशर ट्रक शेड तोडून थेट शेतात घुसल्याने ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.
राहूल राम इक्बाल वय - ३० रा. दत्तनगर चुंचाळे नाशिक असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.
आयशर ट्रक क्रमांक एम एच 15 सी टी 1822 हा गरवारे पॉईंटकडून एक्स लो पॉईंट जवळ आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ट्रक थेट रस्त्याकडील शेडमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. या अपघातप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Share This