त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा जाहीर झाला आहे. राज्याच्या नगरविकास खात्याने ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणावर विकासकामे होणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा जाहीर झाल्याने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर आता तीर्थक्षेत्र ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग यामुळे खुले झाले आहेत.
त्र्यंबकेश्वर देवस्थान हे १४ स्क्वेअर किलोमीटरच्या ‘क’ वर्ग नगरपरिषद अंतर्गत येत होते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्र वर्ग अंतर्गत दर्जा प्राप्त नव्हता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास लक्षात घेता नाशिकचे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा व त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.श्रीया देवचके यांनी नगरपरिषदेचे अभियंता स्वप्निल काकड व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने त्र्यंबक नगर परिषद तीर्थक्षेत्रास ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी प्रस्ताव नगरविकास विभाग २ यांच्याकडे जानेवारी महिन्यात पाठविला होता.
सदरच्या प्रस्तावावर विस्तारितपणे चर्चा होऊन यासंदर्भात नगरविकास विभाग प्रधान सचिव गोविंद राज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सदरच्या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र ‘अ’ वर्ग प्रस्तावास शिफारस करण्यात येऊन सदरचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. सदरच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मान्यता दिली.