वकीलाला धमकाविणा-या पोलीस कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बारामती शहर वकील संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील ऍडव्होकेट अतुल पोपट भोपळे हे त्यांच्या मुलाला ६० टक्के भाजल्याने त्याला कुटूंबियांसह उपचारासाठी कारमधून बुधवारी दि.२९ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घेवून गडबडीत निघाले होते. ते भिगवण येथील चौकात आले असता महिला पोलीसांनी त्यांचे.वाहन थांबविले. मास्क न घालण्याच्या कारणावरून एका कर्मचा-याने त्यांना पावती फाडायला लावली. पावती फाडल्यानंतर ऍडव्होकेट भोपळे यांनी अनेक नागरिक विनामास्क जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणले. त्यावर एका कर्मचा-याने चिडून त्यांचे गचुंडे पकडत त्यांना पोलीसांच्या वाहनात बसविले. अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून तुला जेलमध्ये बसवितो अशी भाषा वापरल्याचे ऍडव्होकेट भोपळे यांनी बारामती शहर पोलीसांना सांगितले. यावेळी चौकात जमलेल्या नागरिकांनी आजारी मुलाच्या उपचारासाठी त्यांना जाऊ द्या अशी विनवणी केल्यानंतर पोलीसांच्या वाहनामधून ऍडव्होकेट भोपळे यांना उतरविण्यात आले. संबंधित कर्मचा-याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी ऍड. भोपळे यांनी केली आहे. या घटनेबाबत बोलताना बारामती शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे म्हणाले, वकिल.हा देखील कायद्याचा एक भाग आहे. त्यांच्या मुलाला गंभीररीत्या भाजले असताना त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. आम्हाला तक्रार देण्यासाठी एक तास ताटकळत ठेवले .पोलीसांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. झालेली घटना निंदनीय असल्याचे बारामती शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड . चंद्रकांत सोकटे यांनी म्हटले आहे.