• Total Visitor ( 133557 )

व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या निचांकी

Raju tapal October 19, 2024 30

व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या निचांकी! 

नवी दिल्ली : सरलेल्या सप्टेंबरमध्ये देशाची व्यापार तूट २०.७८ अब्ज डॉलरवर आकसून, पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे बुधवारी वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. ऑगस्ट २०२४ मध्ये व्यापार तुटीचे प्रमाण २९.७ अब्ज डॉलर होते, जी या तुटीची दहा महिन्यांतील उच्चांकी पातळी होती.

भू-राजकीय आव्हानांमुळे मागणीत वृद्धी झाल्याने व्यापारी मालाची निर्यात ०.५ टक्क्यांनी वाढून, सप्टेंबरमध्ये ती ३४.५८ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात निर्यातीत ९.४ टक्क्यांची घसरण झाली होती. एकीकडे देशाची निर्यात वाढत असली तरी आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होत आहे आणि या दोहोंतील तफावत म्हणजे व्यापार तूट महिनागणिक वाढत चालली आहे. सप्टेंबरमध्ये आयात १.६ टक्क्यांनी वाढून ५५.३६ अब्ज डॉलर नोंदवली गेली. सोन्याची आयात सप्टेंबरमध्ये ४.३९ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात ४.११ अब्ज डॉलर होती.

एप्रिल ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांत निर्यात एक टक्क्याने वाढून २१३.२२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि आयात ६.१६ टक्क्यांनी वाढून ३५०.६६ अब्ज डॉलर आहे. परिणामी पहिल्या सहामाहीत व्यापार तूट १३७.४४ अब्ज डॉलर अशी राहिली आहे.

जागतिक अनिश्चितता असूनही सप्टेंबरमध्ये आणि या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत निर्यातीत सकारात्मक वाढ झाली आहे. तथापि, भू-राजकीय संघर्षामुळे, खनिज तेलासाठी आयातीवर भिस्त असलेल्या अर्थव्यवस्थांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यामुळे विकासदर घटण्याची भीती जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) व्यक्त केली आहे.

निर्यातीला चालना देणाऱ्या क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकी, रसायने, प्लास्टिक, औषध निर्माण, तयार कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश होता. जागतिक पातळीवर अडचणी असूनही चांगली कामगिरी केली आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केले.
 

Share This

titwala-news

Advertisement