वीजबील वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन
वीजबील वसुलीसाठी केल्या जाणा-या सक्तीचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी शिरूर येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून महावितरण कार्यालयाला कंदील भेट म्हणून दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत काळे, हुडकोवासिय कृती समितीचे संघटक शैलेश जाधव, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे, उपतालुकाध्यक्ष रविंद्र गुळादे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, रमणलाल भंडारी, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ.वैशाली साखरे, शहर सचिव विकास साबळे ,शारदा भुजबळ, नितीन वायकर हे सहभागी झाले होते.
शेतकरी वर्गाची आर्थिक लूट करणा-या महावितरणचा धिक्कार असो, सावकारी पद्धतीची जुलमी वीजवसुली थांबलीच पाहिजे, तिघाडी सरकार हाय हाय अशा दुमदुमणा-या घोषणा यावेळी दिल्या.
सद्यस्थितीत महावितरणकडून ज्या पद्धतीने वीजबील व वीजपंप बीलाची वसुली चालू आहे ती जुलमी सावकारी पद्धत असल्याचा आरोप तेजस यादव यांनी यावेळी केला.
आम्ही सत्तेवर आल्यावर वीजबील माफी दिली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीआधी दिले होते आता त्यांना शेतक-यांचा विसर पडला आहे. असा आरोपही यादव यांनी यावेळी केला.
वीजबील वसुली थांबविण्याबाबत मनसेने दिलेल्या निवेदनाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविली जाईल असे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी यावेळी सांगितले.