विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनांचे राज्यभर आंदोलन
पगारवाढ, महागाई भत्ता, बोनस आदी विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनांनी एकत्र येत राज्यभर आंदोलनास सुरूवात केली आहे.
वाकडेवाडी येथील नवीन एस टी डेपोच्या प्रवेशद्वारासमोर एस टी कर्मचा-यांनी बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा एस टी कर्मचा-यांनी दिला आहे.
वाढीव घरभाडे भत्ता मिळालाच पाहिजे महागाई भत्ता मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत पिंपरी येथे एस टी कर्मचा-यांनी आंदोलन केले.
स्वारगेट डेपोत दररोज 1400 एस टी बसेस येतात बेमुदत बंदमुळे स्वारगेट डेपोतून एकही एस टी बस सुटली नाही. राज्य सरकारच्या विविध विभागात काम करणा-या कर्मचा-यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा ही मागणी एस टी कर्मचा-यांनी केली आहे.इतर भत्तेही एस टी कर्मचा-यांना लागू करावेत अशीही मागणी करण्यात आली.
पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर जळगाव याठिकाणीही एस टी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत .
कोल्हापुरातून बाहेर जाणा-या जवळपास 42 फे-या रद्द झाल्या.
जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 आगारातून एकही बस न सुटल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
वार्षिक वेतनवाढीचा दर 2 टक्के ऐवजी 3 टक्के मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा, घरभाडे भत्ता 7, 14 , 21 ऐवजी 8 , 16 , 24 मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा ,शासकीय नियमाप्रमाणे सन अग्रीम रक्कम 12 हजार 500 रूपये देण्यात यावा , राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्त्याचा दर 28 टक्के लागू करण्यात यावा ,दिवाळी भेट 15 हजार रूपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी जळगाव येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीकडून बुधवार दि.27/10/2021पासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील 15 आगारातून एकही बस न सुटल्याने बाहेरगावी जाणा-या , येणा-या प्रवाशांचे तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल झाले.