मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
नवी:दिल्ली :- मतदान ओळखपत्राला आधारकार्डसोबत लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञ लोकांशी चर्चा करुन अंमलबजावणी केली जाणार आहे.
या निर्णयानुसार आता प्रत्येक व्यक्तीला आपलं मतदान ओळखपत्र हे आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव होते. त्याबरोबच विधिमंडळाचे सचिव होते. या बैठकीत अनेक तज्ज्ञही उपस्थित होते. या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, आधारकार्डसोबत मतदाता नोंदणी क्रमांक म्हणजेच जो नंबर ईपीआयसीला लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ईपीआयसी क्रमांकावर आक्षेप घेतला होता. बंगालसह काही राज्यांमध्ये ईपीआयसी क्रमांक समान असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पॅनकार्डप्रमाणेच आता मतदान ओळखपत्रही आधार कार्डाशी जोडण्याची प्रक्रिया वेग धरू लागली होती आज निवडणूक आयोगाने महत्त्वाची बैठक बोलावली, ज्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा तसेच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बोगस मतदार रोखण्यासाठी आणि बनावट मतदार ओळखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता येईल, असा निवडणूक आयोगाचा विचार आहे.