ठाकरे बंधू एकत्र येणार?
'सामना'ची हेडलाईन चर्चेत;
फ्रंट पेजवर राज-उद्धव यांचा फोटो
मुंबई :- आगामी महापालिका निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर एकाकी पडलेल्या ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाकरे मनसेच्या युतीवर बोलताना सुचक वक्तव्य केलं होतं. अशातच उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आता सामनाची हेडलाईन चर्चेत आली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. सामनाच्या मुखपृष्टावर खुप दिवसांनंतर राज-उद्धव यांचा फोटो पहायला मिळाला आहे.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित आणि अस्तित्वापुढे आमच्यातील वाद-भांडणं क्षुल्लक व किरकोळ आहेत. आम्ही एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. विषय इच्छेचा आहे. लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. मी तो पाहतोय, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती, असं सामनामध्ये लिहिण्यात आलंय. तर त्यावर आमच्यात वाद, भांडणं नव्हतीच. जर असलीच तर ती आज संपली, असा प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिला होता. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन मी करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंगतीला बसणार नाही, हे ठरवा, अशी सादही उद्धव ठाकरे यांनी घातली होती, असंही सामनामधून मांडण्यात आलं आहे. दरम्यान, तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल, असा प्रश्न येताच संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी सूर जुळत असल्याचे संकेत दिले. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठंही संभ्रम नाही. त्यांचे सैनिक आणि माझे शिवसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळेच संदेश वगैरे देण्यापेक्षा माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी काही बातमी द्यायची आहे ती बातमी आम्ही देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं.