बत्तीस शिराळ्यात नागपंचमीची परंपरा पुन्हा सुरू होणार?
सरकार दरबारी हालचाली;
जिवंत नागाची पूजा करण्याचा काय आहे इतिहास?
सांगली :- नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळ्यात आता पुन्हा एकदा जिवंत नागाच्या पूजेची प्रथा सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रथा परत सुरू करण्यात यावी यासाठी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी मांडली. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही जिवंत नागाची प्रथा परत सुरू करावी अशी मागणी केली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर दिल्लीत बैठक होणार असून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्याला जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा ही शेकडो वर्षांपासून आले.नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जायची आणि त्यांची मिरवणूक काढली जायची. पण प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर 2002 साली सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागाची पूजा बंद करण्याचे आदेश दिले आणि या प्रथेला खंड पडला.दरम्यान, बत्तीस शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू केली जाईल असं आश्वासन अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं.
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीचा इतिहास काय?
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातंय. दहाव्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले होते. त्यावेळी पंचमीच्या दिवशी ते एका घरी भिक्षा मागायला गेले. ते घर महाजन नावाच्या व्यक्तीचं होतं. भिक्षा जरी मागितली असली तरी बराच वेळ झाला त्यांना भिक्षा मिळाली नाही. नंतर त्या घरातून गृहिणी बाहेर आली आणि तिने महाराजांना भिक्षा दिली.भिक्षा द्यायला वेळ का झाला असं गोरक्षनाथांनी त्या गृहिणीला विचारलं. त्यावर आपण देव्हाऱ्यातील मातीच्या नागाची पूजा करत असल्याचं त्या गृहिणीने सांगितलं. तू जिवंत नागाची पूजा करशील का असं गोरक्षनाथांनी तिला विचारलं. त्यावर त्या गृहिणीने त्यांना होय असं उत्तर दिलं. तेव्हापासून पंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळ्यात नागाची पूजा केली जाते.
बत्तीस शिराळ्यातील महिला या नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याच्यासाठी उपवास करतात. त्या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरले जात नाही किंवा तळले जात नाही. नागपंचमीच्या निमित्ताने नागाची पूजा करुन त्याला दूध पाजले जाते आणि त्याला वेगवेगळ्या भाज्यांचा निवैद्यही दाखवला जातो.
न्यायालयाने बंदी घालायच्या आधी बत्तीस शिराळ्यात मोठ्या उत्सहाने नागपंचमी साजरी केली जायची. आधी गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जाते आणि नंतर प्रत्येकाच्या घरात पूजा केली जायची. या दिवशी नागाच्या प्रतिमेची आणि जिवंत नागांची ट्रॅक्टरमधून मिरवणूकही काढली जायची. बत्तीश शिराळ्यातील नागपंचमी पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थिती लावतात.
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीची दखल ही केवळ देशभरातच नव्हे तर जागतिक स्तरावरही घेतली गेली आहे.