• Total Visitor ( 400617 )
News photo

शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य युवकांनी अंगी बाळगावे

Raju tapal February 23, 2026 27

शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य युवकांनी अंगी बाळगावे;डाॅ.पांडुरंग कंद

        

शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य युवकांनी अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन युवा व्याख्याते  पांडुरंग कंद यांनी केले. तळेगांव ढमढेरे,येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज तळेगांव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत 'ज्यांच्या हाती शून्य होते' या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना  कंद बोलत होते. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाची तीन दिवसीय बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आजपासून महाविद्यालयात आयोजित केली  आहे. त्या व्याख्यानमालेचा प्रारंभही आजपासून महाविद्यालयात झाला.  महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे,शकुंतला फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई महेशबापू ढमढेरे, अपर्णा साबणे,व्याख्यानमालेचे समन्वयक दत्तात्रय वाबळे,बहि;शाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह संभाजी शिंदे आदि यावेळी उपस्थित होते. साहेबरावअण्णा शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. कंद पुढे म्हणाले की,त्याग आणि संघर्षातूनच आयुष्य उभे राहते. शुरवीरांचा, क्रांतिकारकांचा, हुतात्म्यांचा आणि संतांची शिकवण लाभलेला हा महाराष्ट्र आहे. म्हणून महाविद्यालयीन युवकांनी सदैव महापुरुषांचा आदर्श विचार आणि कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन कंद यांनी केले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम,यशवंतराव चव्हाण,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,कर्मवीर भाऊराव पाटील अशा प्रतिकूल परिस्थितीत आयुष्य उभे केलेली व्यक्तिमत्वे आपल्या समोरील आदर्श आहेत. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी जिद्दीच्या जोरावर जीवनात यशस्वी होता येत असल्याचे  कंद यावेळी म्हणाले.  महाराष्ट्राच्या भूमीचा दैदिप्यमान इतिहास काळाच्या पडद्याआड जाता कामा नये. कारण सदैव प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून यावा असे शौर्य आणि पराक्रम या भूमीत घडलेला आहे. म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व आज युवकांचे प्रेरणास्थान असायला हवे असल्याचे श्री. कंद म्हणाले. ज्यांना महापुरुष आणि समाजसुधारक कळाले त्यांच्या आयुष्याचे सोने होणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. अपर्णा साबणे यांनीही यावेळी भारतीय संस्कृती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. माणूस आणि माणुसकी असलेला समाज आपल्याला घडवायचा असल्याचे प्रतिपादन साबणे यांनी केले. युवकांनी दिव्याप्रमाणे त्याग आणि समर्पणाची भावना जोपासणे काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. संस्कृती,प्रकृती आणि विकृती यातील फरक प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. साबणे म्हणाल्या. शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तरुणांनी सातत्याने सदविचारांचा आग्रह धरायला हवा. आपल्या पालकांची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम करून जीवनाला आकार देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी केले. थोर व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणेतूनच युवकांनी स्व- कर्तुत्व घडविण्यासाठी सदैव तत्पर असण्याचे आवाहन त्यांनी केले. संगणक साक्षरता ही आजच्या काळातील नितांत गरज आहे. परंतु सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवावे असे आवाहन देखील महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी केले. शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. शकुंतला फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई महेशबापू ढमढेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  फाउंडेशनच्या  माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. प्राचार्य अर्जून मुसमाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. उज्वल विचारांचा वारसा घेऊन शिक्षण प्रसारक मंडळ सक्षमपणे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा.डॉ.दत्तात्रय वाबळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.  बहिशाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा.डॉ. संभाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. शाकुराव कोरडे यांनी आभार मानले. मराठी विभागप्रमुख  संदीप सांगळे,सोमनाथ पाटील,पद्माकर गोरे,मनोहर जमदाडे,अमेय काळे,सुमेध गजबे,विवेक खाबडे,रवींद्र भगत,प्रमोद पाटील,प्रीती पवार,विद्या टुले,कांचन गायकवाड,राहुल महाजन,अविनाश नवले, राम कराळे, 

अश्विनी पवार,आकाश मिसाळ, कल्याणी ढमढेरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement