११ वर्षीय विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले
शाळा सुटल्यावर घराकडे जात असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला ट्रकने चिरडल्याची घटना वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शनिवार दि.१८ /१२/२०२१ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
संकेत महाजन वय -११ असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
कुरूंदा येथील नरहर कुरूंदकर विद्यालयातील इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शाळा गावाकडे सायकलवरून जात होता. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ समोरून येणा-या हळद घेवून जात असलेल्या आर.जे. २१ सी .बी. ७८७७ या क्रमांकाच्या ट्रकने संकेतला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात सायकलचा चुराडा झाला.
कुरूंदा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला.
दुस-या घटनेत पैशासाठी खून करून मृतदेह जुन्या घरातील स्वच्छतागृहात टाकल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे गुरूवारी १६/१२/२०२१ रोजी घडली.
सांगवी येथील मनोज बागल यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य असून ते वाहनचालक म्हणून काम करतात. गुरूवारी त्यांचा मुलगा ओम बागल वय - ५ हा मोबाईलवर गेम खेळत होता. वडिलांनी मोबाईल मागून घेतला असता त्याने त्यांच्याकडून १० रूपये मागून घेतले. त्यानंतर तो डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी दुकानात गेला. महिला दुकानदाराने त्याला गोळी दिली नाही. तो घरी न परतल्याने वडिलांनी दुकानदाराकडे जावून चौकशी केली असता परत गेला म्हणून सांगितले. सगळीकडे शोधाशोध करूनही तो मिळून न आल्याने या घटनेची माहिती त्यांनी पोलीसांना कळविली.
सकाळी शोध घेत असताना गावातील एका बंद असलेल्या घरातील जुन्या अडगळीत असलेल्या खोलीतील स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या कानातील सोन्याच्या कड्या काढून घेतल्याने कानाजवळ जखमा झाल्याचे आढळून आले.
मारेकरी खून करणारा युवक हा १७ वर्षीय अल्पवयीन असून तो उस्मानाबाद येथील इंग्रजी शाळेत शिकत आहे. तो वडिलांच्या खात्यातून पैसे काढून खर्च करीत असे. त्या पैशाची भरपाई त्याने गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कुणीही नसल्याचे पाहून दारासमोरून जाणा-या ओमला घरात ओढले. नायलॉन दोरीने गळा आवळून त्याने त्याचा खून केला. नंतर त्याने त्याच्या कानातील सोन्याच्या कड्या काढून घेतल्या. मृतदेह घरात जुन्या स्वच्छतागृहात टाकला. सकाळी आरोपीच्या वडिलांनी चिमुकल्याचा मृतदेह पाहिला असता त्यांनी ही माहिती पोलीसांना कळविली.