आयटीआयच्या इमारतींसाठी १३ कोटी मंजूर अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात; काम लागणार मार्गी
क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे १३ कोटी ४६ लाख ५० हजार रकमेच्या अंदाजपत्रकास सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या शासकीय आयटीआयला इमारत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येथील शासकीय तांत्रिक विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारत बांधकामासाठी यापूर्वी २००८ मध्ये २ कोटी ९८ लाख ८३ हजाराच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळली होती. परंतु प्रशासकीय कारणास्तव हे बांधकाम सुरू करण्यात आले नाही.
क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर केला होता. २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथील कनिष्ठ अभियंता यांनी तयार केले आहे. त्या प्रस्तावाला राज्य सरकारने २४ मार्चला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या शासकीय आयटीआयला हक्काची इमारत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सध्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र भडगाव-खोंडे येथील भाड्याच्या जागेत सुरू आहे.