७ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळून गेलेला वाहनचालक वाकड पोलीसांच्या ताब्यात
Raju Tapal
December 20, 2021
40
७ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळून गेलेला वाहनचालक वाकड पोलीसांच्या ताब्यात
काळेवाडी फाट्यावर ७ वर्षाच्या मुलाला व त्याच्या आईवडिलांना धडक देवून पळून गेलेल्या वाहनचालकाला ताब्यात घेण्याची कार्यवाही वाकड पोलीसांनी केली.
८ डिसेंबर २०२१ ला काळेवाडी फाट्यावर पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास संघर्ष कनवरलाल गवळी वय - ७ ,कनवरलाल विष्णू गवळी वय - ३५,राजश्री कनवरलाल गवळी रा.काळेवाडी फाटा या तिघांना अज्ञात वाहनचालक वाहनाची धडक देवून पळून गेला होता.
अज्ञात वाहनाच्या धडकेत संघर्ष कनवरलाल गवळी या ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात संघर्ष याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी , आई राजश्री कनवरलाल गवळी हे जखमी झाले होते.
अपघात करून पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाच्या शोधासाठी वाकड पोलीसांनी पथक तयार करून शोध घेण्यास सुरूवात केली.
पोलीसांनी काळेवाडी फाटा परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
पोलीसांना घटनास्थळी एक आरसा आढळून आला. तो वाहनाच्या डाव्या बाजूचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरूनही तपास केला.
हा अपघात एका टेम्पोने केला असून तो थेरगाव येथील असल्याचे तपासात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेवून टेम्पोचालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, अपघाताच्या घटनेच्या दिवशी हा टेम्पो त्याचा मित्र तेजस शशिकांत बारसकर वय -१९ रा गुरूद्वारा चौक वाल्हेकरवाडी याच्याकडे होता. पोलीसांनी तेजस याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपघात झाल्यानंतर घाबरून पळून गेल्याचे त्याने पोलीसांना सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव सहाय्यक फौजदार बाबाजान इनामदार, नाईक अतिक शेख, विक्रांत चव्हाण यांनी ही कार्यवाही, कामगिरी केली.
Share This