इतर मागासवर्गीय उद्योजकांना सुवर्णसंधी
शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
ठाणे : राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळांची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घ्यावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.
छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता रु.१.०० लक्ष थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज नाही) व २०% बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १०.०० लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष ते रु.५०.०० लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.
थेट कर्ज योजना व २०% बीज भांडवल योजना या योजनांचे अर्ज ठाणे जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना पुढीलप्रमाणे:-
1. रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजना:- सिबील क्रेडीट स्कोर किमान ५०० असलेल्या लाभार्थीना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा १८ ते ५५ वर्षे आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. याकरिता मासिक हप्ता रु.२०८५/-.
2. 20%बीज भांडवल योजना:- कर्जाची उच्चतम मर्यादा रु.५.०० लक्ष पर्यंत. कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. बँकेमार्फत लाभार्थीना ७५% कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये लाभार्थीचा सहभाग ५% महामंडळाचा सहभाग २०% बँकेचा सहभाग ७५% महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर व्याजाचा दर ६% असतो.
वरील योजनांसाठी लागणारी सर्वसाधारण कागदपत्रे - पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यानी दिलेला उत्पत्ताचा मूळ दाखला (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लक्ष), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (इ.मा.व.), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधा पत्रिकेची झेरॉक्स, सिबील क्रेडीट रिपोर्ट पेट कर्ज योजनेकरीता (स्कोर किमान 500 असावा), स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल किंवा रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागा मालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा अॅसेसमेंट उतारा इ. कागदपत्रे लागतात.
3. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 लक्ष पर्यंत):- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु.१०.०० लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावधी ५ वर्ष असेल. या योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.८.०० लक्ष पर्यंत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य असून महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.
4. गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत):- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरणः प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बॅक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.8.00 लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु.१०.०० लक्ष ते रु.५०.०० लाख पर्यंत मंजुर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय १८ ते ४५ पर्यंत असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान ५०० इतका असवा.
परतफेडीचा कालावधी मंजुर कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो. कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर (जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि रु.१५.०० लाखाच्या मबदित) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटाला (अर्जदारास) त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजुर करुन घ्यावे लागेल.
5. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाः-
१. राज्य देशांतर्गत व आंतराष्ट्रीय विद्यार्थी / विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रक्कमे मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्या/विद्यार्थीनींना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
२. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित क शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
३.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्य देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.१०.०० लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.२०.०० लक्ष कर्ज मर्यादेत वितरीत केलेल्या रक्कमेवरील कमाल १२% व्याज परतावा महामंडल अदा करण्यात येईल.
४. विद्यार्थ्यांचे वय १७ ते ३० वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
५. अभ्यासक्रम:- १) आरोग्य विज्ञान २) अभियांत्रीकी ३) व्यवसायिक व व्यवस्थापन ४) कृषी, अन्न प्रक्रिया व पशु विज्ञान अभ्यासक्रम
अ. राज्यांतर्गत अभ्यासक्रम :- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी -
आ. देशांतर्गत अभ्यासक्रम :- देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
इ. परदेशी अभ्यासक्रम (Foreign Education):- परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रॅंकिंग / गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE), Test of English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
ड. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने / शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समविष्ट केल्यास त्यानुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील.
6. कौशल्य विकास प्रशिक्षण योजना :-
राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इतर मागासवर्गीय समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून कौशल्यपूर्ण बनवणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
1. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणीबाबत MSSDS यांना सहाय्य करणे,
2. प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत MSSDS च्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलशी जोडणी करण्यात येईल.
3. महामंडळाकडून या पोर्टलचे Login, Credential Customized करुन घेण्यात येईल.
4. महामंडळ निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करून त्याची अंमलबजावणी करेल.
5. समुपदेशन उपक्रम, असंघटित्त क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी MSSDS च्या जिल्हा यंत्रणेशी महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहाय्य करील.
7. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना:-
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मा.वि.म.) लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) मार्फत ही योजना राबविण्यात येते.
योजनेचा उद्देश व स्वरूप - इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरु, परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उदयोगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु.5.00 ते 10.00 लक्षपर्यतच्या कर्ज रक्कमेवरील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येईल. इतर मागास प्रवर्गातील किमान 50% महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचतगटास प्रथम टप्यात रु.5.00 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. बँकेकडून मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे –
1. अर्जदारास सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला इ.मा.व. जातीचा दाखला (OBC)
2. वयाचा पुरावा उदा. जन्म तारखेचा पुरावा/ शाळा सोडल्याचा दाखला
3. रहिवासी दाखला (आधार कार्ड, लाईट बिल, व्होटर कार्ड इ.)
4. बचत गटाचे बैंक पासबुक
5. बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र अथता स्वयं-घोषणापत्र
लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती-
1. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे असावे.
2. महिला बचतगटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी.
3. प्रथम टप्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्यात रु.10.00 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजुर करून घेण्यास पात्र होईल.
कार्यपद्धती :- ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नौद करणे आवश्यक आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक, गरजू इ.मा.व. (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तिंनी योजनांच्या अधिक माहितीकरीता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि.चे जिल्हा कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कळवा, ठाणे, दुसरा मजला, दत्तवाडी स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजूला खारेगांव, कळवा ठाणे - 400605 ईमेल- dmobcthane@gmail.com येथे संपर्क साधावा, तसेच अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक (अ.का.) निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.
0000000