आग्र्याहून सुटका स्मृतीदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून १६६६ मध्ये पुणे जिल्ह्यातील किल्ले राजगड येथे सुखरूप परतले. या घटनेला ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत.
पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आग्र्याहून सुटका स्मृती दिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि.५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कसबा पेठेतील लाल महाल येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे. अशी माहिती श्री.शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे यांनी पत्रकारांना दिली.
हा दिवस मागील ४० वर्षापासून दोन्ही संस्थांच्या वतीने साजरा करण्यात येतो. यंदा उत्सवाचे ४१ वे वर्ष आहे.
पुण्यामध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गडजागरण, पोवाडा, व्याख्यान, सुर्योदयास ध्वजारोहण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार गिरीश बापट, निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले, महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. संपुर्ण उत्सवात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
किल्ले राजगड येथे ११ डिसेंबर यादिवशी सायंकाळी ७ वाजता राजगड पायथा पाली गाव खंडोबाचा माळ येथे गड जागरण कार्यक्रम होणार आहे. तसेच राजगडावर पद्मावती माता मंदीर येथे शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे व्याख्यान होणार आहे.
१२ डिसेंबर या दिवशी सुर्योदयाच्या वेळी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सकाळी ९ वाजता पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत आणि त्यानंतर पद्मावती माता मंदीर येथे पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.