अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार (82 वर्ष) यांचे निधन झाले.कोकणातून परत येत असताना मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ओळख होती. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रत्नागिरी मराठा बिझनसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते परवा मुंबईहून तेथे गेले होते.मंगळवारी संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11 वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मराठा आरक्षणाचा विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मताचे ते होते. त्यासाठी या वयातही आंदोलन केले व आंदोलन प्रखर करण्याचा इरादा त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरु असून त्यासाठी त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते. मराठा महासंघात दोन वर्षांपूर्वी फूट पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप झाला होता. त्यामुळे ते सतत विवंचनेत होते.मात्र त्यातूनही सावरून पुन्हा त्यांनी संघटना बांधणीचे काम सुरु केले होते.
इतर समाजासोबत समन्वयाची भूमिका
कट्टर मराठा नेते असले तरी अन्य समाजांबरोबर त्यांनी समन्वयाची भूमिकाही घेतली होती. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी महापुरुषांबाबत अनुदार उद्गार काढल्यामुळे वादंग झाला होता. त्यावेळीही त्यांनी या विधानांचा निषेध करताना सर्व जातींसंदर्भात समतोल भूमिका घेतली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता.
शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरु झाली. सन 1981 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे 1964 पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर 1990 च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी 1980 पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.
आपली वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारुपाला आणली होती. आरक्षणाच्या चळवळीत काहीकाळ अण्णासाहेब पाटील त्यांच्याबरोबर होते. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम ही संस्था वाढवण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.