• Total Visitor ( 133749 )

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिवाचा अपघाती मृत्यू

Raju tapal February 04, 2025 52

लग्न समारंभाहून परतताना काळाचा घाला;
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिवाचा अपघाती मृत्यू;

कार्यकर्त्यांवर शोककळा 

बीड :- बीड जिल्ह्यातील नाकलगाव येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माजलगाव शहराजवळ असलेल्या खरात आडगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील अज्ञात वाहनाने ते रस्त्याच्या कडेला उभे असताना त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

श्रीहरी काळे नातेवाईकाच्या लग्न समारंभास सकाळी मोटारसायकलवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. भगवान सरवदे होते. सायंकाळी लग्नकार्य उरकून ते परभणीकडून माजलगावकडे राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणम वरून येत होते. माजलगाव शहरापासून १० किमी अंतरावर असणाऱ्या खरात आडगाव फाटा येथे चहापाणी घेण्यासाठी त्यांनी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान गाडी थांबवली.

यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ. सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने काळे यांना जोराची धडक दिली. तर दुसऱ्या बाजूने दुचाकीवरून उतरणारे डॉ.सरवदे हे सुखरूप बचावले. अपघातानंतर स्थानिकांनी काळे यांना तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले श्रीहरी काळे यांच्या निधनाने माजलगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राध्यापक श्रीहरी काळे हे उत्तम वक्ते होते. माजलगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची मोठी धुरा सांभाळली होती. त्यांच्या या दुःखद निधनाने त्यांचे मूळ गाव असलेल्या नाकलगाव या ठिकाणी शोककळा पसरली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement