अनुसूचित जाती / नवबौद्ध व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/ बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व स्वावलंबन योजनांचा लाभ घेण्याबाबत
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
ठाणे:- अनुसूचित जाती / नवबौद्ध तसेच अनुसूचित जमाती / आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी कृषी विभागामार्फत “डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना” आणि “बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना” प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.या योजनांच्या माध्यमातून सिंचन सुविधा,कृषी यांत्रिकीकरण तसेच जलसंधारणासाठी विविध घटकांवर अनुदान देण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत नवीन सिंचन विहीर,जुनी विहीर दुरुस्ती,इनवेल बोअरिंग,वीज जोडणी आकार,पंपसंच,सोलार पंप,एचडीपीई / पीव्हीसी पाईप,ठिबक व तुषार सिंचन संच,बैलचलित व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे तसेच परसबाग आदी घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.“डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना” आणि “बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना” अंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी कमाल ४ लाख रुपये,जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाख रुपये,शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण २ लाख रुपये,इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार रुपये,पंपसंचसाठी ४० हजार रुपये,सोलार पंपासाठी ५० हजार रुपये,यंत्रसामुग्री ५० हजार रुपये,परसबाग ५ हजार रुपये,एचडीपीई/ पीव्हीसी पाईप ५० हजार रुपये तसेच ठिबक सिंचन संचासाठी ९७ हजार रुपये आणि तुषार सिंचन संचासाठी ४७ हजार,विज जोडणी आकार २० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत विंधन विहिरीसाठीही ५० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर शेतजमीन असावी.अर्जासोबत जातीचा दाखला,७/१२ उतारा,८-अ उतारा,आधारकार्ड,आधार लिंक असलेले राष्ट्रीयकृत बँक खाते,Farmer ID आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक आवश्यक राहणार आहे.
जुनी विहीर दुरुस्तीच्या लाभासाठी ७/१२ उताऱ्यावर विहिरीची नोंद असणे आवश्यक असून,विद्युत पंप संचासाठी वीज कनेक्शन कोटेशन भरणा पावती अथवा वीज बिल सादर करणे बंधनकारक आहे.ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी स्वतःच्या नावावर ट्रॅक्टर असणे आवश्यक असून त्यासाठी आरसी बुकची प्रत सादर करावी लागणार आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नवीन विहीर,जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एका पॅकेजचा लाभ घेता येणार आहे.तसेच एखाद्या लाभार्थ्याने योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे त्याच लाभार्थ्यास अथवा त्यांच्या कुटुंबास या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.नवीन विहिरीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास २० वर्षांनंतर जुनी विहीर दुरुस्तीचा लाभ अनुज्ञेय राहील.
सदर योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती येथील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद ठाणे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.