अक्षय शिंदेच्या पालकांचा केस न लढण्याचा निर्णय
बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर केलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या पालकांनी आपल्याला केस लढायची नसल्याचे सांगितले आहे. आम्हाला आमच्या मुलाच्या एन्काऊंटर प्रकरणाची केस लढवायची नसल्याची भूमिका अक्षयच्या पालकांनी घेतली आहे. यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. मात्र, आम्हाला ही धावपळ आता जमत नाही असे म्हणत अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिला आहे. यावर आता आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट होता आणि त्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पाच पोलिसांवर काय कारवाई केली? या प्रकरणावर गुरुवारी दिवसभर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र या दिवशीचे काम संपताना कोर्टात उपस्थित असलेल्या अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी पुढे येत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडे हात जोडून केस लढवत नसल्याबाबत विनंती केली.
अक्षय शिंदेचे बनावट एन्काऊंटरचे प्रकरण आता यापुढे आम्हाला न्यायालयात लढवायचे नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. याबाबत कोर्टाने तुम्ही असा निर्णय का घेतात आहात? असे विचारले आता अक्षय शिंदेचे आई वडील म्हणाले की, आता ही धावपळ, त्रास, खर्च आम्हाला झेपत नाही. आमच्या सुनेला नुकतेच बाळ झाले आहे. आम्हाला आता त्याच्याकडे जायचे आहे. त्यामुळे ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. आमच्या राहण्याची कुठेही सोय नाही. त्यामुळे अशात आम्हाला हा न्यायालयीन लढा लढायचा नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. आता यावर हायकोर्टात आज (शुक्रवार) पुन्हा सुनावणी होणार आहे.