अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, दगडफेकीनंतर तोडफोड, नेमकं काय घडलं?
Raju tapal
December 23, 2024
15
अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, दगडफेकीनंतर तोडफोड, नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेकीची घटना घडलीय. तसंच, अल्लू अर्जूनचया घराबाहेर तोडफोडही करण्यात आलीय. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय.
दगडफेक आणि तोडफोड प्रकरणातले आरोपी उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉईंट अॅक्शन कमिटीचे सदस्य असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं हैदराबादच्या वेस्ट झोन डीसीपींनी म्हटलं आहे.
डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, "ही घटना रविवारी (22 डिसेंबर) सायंकाळी पावणे पाच वाजता घडली. सुरुवातीला अचानक काही लोक हातात फलक घेऊन अभिनेता अल्लू अर्जून याच्या घरासमोर जमा झाले आणि त्यांनी घोषणा दिल्या. नंतर आंदोलक करणाऱ्यांपैकी एकजण सुरक्षा भिंतीवर चढला आणि घराच्या परिसरात टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा झटापट झाली आणि आंदोलकांनी सुरक्षा भिंतीवर चढत सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनी तेथे ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांची तोडफोड केली."
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुबली हिल पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी 6 जणांना ताब्यात घेतले.
हे सर्व उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉईंट अॅक्शन कमिटीचे सदस्य असल्याचा दावा केला जात आहे, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.
अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आमने-सामने का आलेत?
पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर संध्या चित्रपटगृहात आयोजित करण्यात आलेल्या खास शो च्या वेळेस एका महिलेचा मृत्यू झाला होता.
त्यासंदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अभिनेते अल्लू अर्जुन आपापली बाजू मांडत आहेत.
आता या प्रकरणाची सोशल मीडियापासून ते तेलंगणाच्या विधानसभेपर्यंत चर्चा होत आहे. माध्यमांसमोरही अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याच्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की,"मी माझ्या सर्व चाहत्यांना त्यांच्या भावना नेहमीप्रमाणे जबाबदारीने व्यक्त करण्याचे आवाहन करतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कुठेही आपल्या भावना व्यक्त करताना आक्षेपार्ह भाषा किंवा वर्तन करू नका."
पुष्पा 2 मधील अभिनेता अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
या प्रकरणाबाबत रेवंत रेड्डी अलीकडेच विधानसभेत बोलले होते. ते म्हणाले होते की, पोलिसांनी सांगून देखील अल्लू अर्जुन नं यात निष्काळजीपणा केला.
त्यानं पोलिसांचं ऐकलं नाही. याआधी, काही दिवसांपूर्वी रेवंत रेड्डी यांनी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनीशी बोलताना देखील काही प्रतिक्रिया दिल्या होत्या.
अलीकडेच जेव्हा रेवंत रेड्डी विधानसभेत बोलले तेव्हादेखील त्यांनी अल्लू अर्जुन आणि काहीजण चित्रपट उद्योगाला ज्या पद्धतीनं वागवतात त्याबद्दल टिप्पणी केली होती.
त्यानंतर काही तासांमध्येच अल्लू अर्जुन यांनं देखील पत्रकार परिषद घेत रेवंत रेड्डी यांचे नाव न घेत आपल्यावरील आक्षेपांना उत्तर दिलं होतं.
अल्लू अर्जुन म्हणाला की, त्याच्या विरोधात अपप्रचार केला जातो आहे आणि कोणीही पोलीस त्यांना सूचना देण्यासाठी त्यांच्याकडे आला नव्हता.
चार डिसेंबर रोजी काय घडलं होतं?
4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जूनचा चित्रपट 'पुष्पा-2 : द रुल' च्या रिलीजच्या पूर्वसंध्येला हैद्राबादलमधील 'संध्या थिएटर'मध्ये चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी बऱ्याचशा लोकांनी अॅडव्हान्स तिकीट खरेदी करून चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
अल्लू अर्जूनच्या टीमनं अचानकच इथे हजेरी लावून कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं. जेव्हा अल्लू अर्जून थिएटरमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एकच झुंबड उडाली.
अल्लू अर्जून आणि त्याची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेले 30 ते 40 जण थिएटरच्या खालच्या भागात चित्रपट पाहण्यासाठी हजर झाले.
त्यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि सुरक्षा कर्मचारी कमी जागेत उपस्थित असल्यानं एकच झुंबड उडाली. या दरम्यान तिथे रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
रेवती या त्यांचे पती भास्कर आणि आपला लहान मुलगा आणि लहान मुलीसोबत आल्या होत्या. मात्र, थिएटरमधील चेंगराचेंगरीत रेवती आणि त्यांचा मुलगा खाली पडले आणि बेशुद्ध झाले.
या चेंगराचेंगरीतच रेवती यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जूनसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र, काही वेळानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.
संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी 8 डिसेंबर रोजी पोलिसांनी तिघांना अटक केली होती.
पोलिसांनी संध्या थिएटरचे मालक एम संदीप, वरिष्ठ व्यवस्थापक एसएम नागराजू आणि खालच्या बाल्कनीचे प्रभारी जी विजया चंद्रा यांना अटक केली आहे.
या प्रकरणी संध्या थिएटरच्या व्यवस्थापनाने तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
रेवंत रेड्डी काय म्हणाले?
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, चित्रपट निर्माते त्यांचा व्यवसाय करू शकतात. मात्र चित्रपट निर्माते जर लोकांच्या जीवाशी खेळत असतील तर ते गप्प राहणार नाहीत.
पुष्पा 2 चित्रपटाच्या वेळेस संध्या चित्रपटगृहात झालेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
विधानसभेत बोलले. रेवंत रेड्डी म्हणाले की अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यावर काही राजकीय पक्षांनी अत्यंत राक्षसी वर्तन केलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
संध्या चित्रपटगृहातील घटनेबद्दल विधानसभेत रेवंत रेड्डी बोलले...
पोलिसांनी संध्या चित्रपटगृहातील विशेष शो ला परवानगी दिली नव्हती. पोलिसांचं म्हणणं होतं की, जर इथे एखादा सेलिब्रिटी आला तर अडचणी येतील कारण संध्या चित्रपटगृहात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एक मार्ग आहे. परवानगी दिलेली नसताना देखील पुष्पा चित्रपटाचा नायक चित्रपटगृहात गेला.
जर अल्लू अर्जुन फक्त चित्रपटगृहात गेला असता आणि त्यानं फक्त चित्रपट पाहिला असता तर काहीही हरकत नव्हती. मात्र चित्रपटगृहात जात असताना रस्त्यातच त्यानं त्याच्या कारचा रुफ टॉप उघडला आणि रोड शो केला. यामुळे आसपासच्या सर्व चित्रपटगृहातील लोक अचानक संध्या चित्रपट गृहाकडे आल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली.
"रेवती या महिलेचा या घटनेत मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा कोमामध्ये गेला. या भयंकर चेंगराचेंगरीमध्ये देखील त्या आईनं आपल्या मुलाचा हात सोडला नाही.
एका आईचं आपल्या मुलावर इतकं प्रचंड प्रेम असतं. आपल्या मुलाचा हात हाती असतानाच त्या आईचा मृत्यू झाला," असं रेवंत रेड्डी पुढे म्हणाले.
आम्ही अल्लू अर्जुनला इशारा दिला होता
चित्रपटाचा नायकच चित्रपटगृहात असल्यामुळे चित्रपटागृहाच्या आत देखील चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी अल्लू अर्जुनला सांगितलं की, तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. मात्र तरीदेखील त्यांनी ऐकलं नाही.
पोलीस आयुक्त म्हणाले की, चित्रपटाचा नायक चित्रपटगृहा बाहेर जाण्यास तयार झाला नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्तांना त्यांना सांगावं लागलं की जर ते तिथून गेले नाहीत तर त्यांना अटक करण्यात येईल.
त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी अल्लू अर्जुन ला कारमध्ये बसवलं. मात्र तिथून जात असताना देखील अल्लू अर्जुननं कारचं रुफ टॉप उघडलं आणि रो शो केला. या घटनेबाबत पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी उत्तरं देऊन त्यांचं कर्तव्य बजावलं. तर काही राजकीय पक्षांनी या गोष्टीला राक्षसी दाखवण्याचा प्रयत्न केला.
ज्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला, त्या कुटुंबातील मुलगा अल्लू अर्जुनचा चाहता असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाची तिकिटं विकत घेतली होती.
मात्र त्या मुलाच्या आईचा चित्रपटागृहात चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर, अल्लू अर्जुननं त्या कुटुंबाला भेट दिली नाही किंवा त्या मुलाची भेट घेतली नाही.
जे लोक दहा वर्षे मंत्री होते, ते देखील अशा अमानुष लोकांना पोलीस ठाण्यात नेलं म्हणून सरकावर टीका करत आहेत. जे लोक मृत्यूला जबाबदार आहेत त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं असता, या घटनेबाबत सरकारला दोष देत ते अत्यंत वाईट भाषा वापरतात.
"चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणून आमच्या सरकारनं चित्रपटांच्या विशेष शो ला परवानगी दिली आहे. जर त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आणि आम्ही त्यांना काहीच बोललो नाही, तर तो न्याय आहे.
चित्रपट आणि राजकारण्यांसाठी काही विशेष कायदा आहे का? आमचं सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार काम करतं आहे," असं रेवंत रेड्डी म्हणाले.
"अल्लू अर्जुन यांच्या घराबाहेर रांगा लावणाऱ्या सेलिब्रिटींपैकी कोणी त्या महिलेच्या कुटुंबाला भेटलं आहे का? चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटींना काय हवं आहे हे मला माहिती नाही.
त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा. मात्र जर ते लोकांच्या जीवाशी खेळणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही जोपर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत अशा गोष्टी चालू दिल्या जाणार नाहीत," असं रेवंत रेड्डी म्हणाले.
अल्लू अर्जुन काय म्हणाला?
रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत या घटनेबद्दल जी टिप्पणी दिली. त्याला अल्लू अर्जुननं उत्तर दिलं. अल्लू अर्जुन म्हणाला की, त्याच्या विरोधात करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत.
"चित्रपटगृह माझ्यासाठी एखाद्या मंदिरासारखं आहे. तिथे काही झालं तर मला दु:ख होणार नाही का? मी परवानगीशिवाय चित्रपटगृहात गेलो होतो ही चुकीची माहिती आहे," असं अल्लू अर्जुन म्हणाला.
"तेलुगू लोकांचं नाव उंचावण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रसार माध्यमांसमोर माझ्यावर असे खोटे आरोप केल्यामुळे मला खूप वाईट वाटतं," असं अल्लू अर्जुन म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, मी रोड शो करण्यासाठी चित्रपटगृहात गेलो नव्हतो. मी माझ्या चाहत्यांना बाजूला होण्यास सांगितलं आणि पुढे गेलो. अल्लू अर्जुन म्हणाला की, तो चित्रपटगृहात असताना पोलीस आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की बाहेर प्रचंड गर्दी जमली आहे. त्यानंतर तो लगेच तिथून निघून गेला.
अल्लू अर्जुन म्हणाला की, त्याला दुसऱ्या दिवशी कळालं की चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.
तो पुढे म्हणाला की, त्यानं बन्नी वासूला फोन केला आणि त्याला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जा आणि जखमी झालेल्या श्री तेजची भेट घे.
"मला देखील हॉस्टिपलमध्ये जाऊन त्या मुलाची भेट घ्यायची होती. मात्र माझ्या वकिलांनी मला सांगितलं की, या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यामुळे कायद्यानं मला त्या मुलाला भेटता येणार नाही. मला दर तासाला श्री तेजबद्दल माहिती मिळते होती. तो मुलगा आता बरा आहे," असं अल्लू अर्जुन म्हणाला.
विरोधकांचा आरोप
रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत अल्लू अर्जुनच्या अटकेवर विरोधकांच्या प्रतिक्रियेवर टीका केली तेव्हा विरोधकांनीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
बीआरएसचे नेते आणि माजी राज्यमंत्री हरीश राव यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
बीआरएसचे नेते आणि माजी राज्यमंत्री हरीश राव
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी माईक मागितला असता, त्यांना माईक का देण्यात आला नाही, याप्रकरणी मुख्यमंत्री इतके घाबरून का आहेत, असा सवाल त्यांनी केला.
चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यूचा निषेध करतो आणि संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे समर्थन करत नाही, असे बीआरएसने म्हटले आहे.
Share This