सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जीवनाची वाटचाल करावी ;
प्रा. सुभाष राजवाळ यांचे आवाहन
साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचा तळेगाव ढमढेरेत समारोप
शिरूर :- दु:ख कुरवाळत न बसता सकारात्मक दृष्टिकोन बाळगून जीवनाची वाटचाल करावी असे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.सुभाष राजवाळ यांनी केले.
तळेगांव ढमढेरे, (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळ, शकुंतला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगांव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित केलेल्या साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप आज झाला. व्याख्यानमालेचा समारोप करताना "सकारात्मक जीवनशैली" या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना प्रा. राजवाळ बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, शकुंतला फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई महेशबापू ढमढेरे, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. पराग चौधरी, वरिष्ठ लिपिक नामदेव भोईटे व्याख्यानमालेस उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे सहावे वर्ष आहे.
प्रा. राजवाळ पुढे बोलताना म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत आपण प्रत्येकजण नैराश्याने ग्रासलेलो आहोत. जीवन खूप सुंदर आहे. त्यामूळे आपण दुःख कुरवाळत न बसता सकारात्मक दृष्टीकोन बाळगून जीवनाची वाटचाल करावी असे आवाहन प्रा. सुभाष राजवाळ यांनी यावेळी केले. जगणे हरवलेल्या या परिस्थितीत सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा मंत्र आपण शोधायला हवा. अशा परिस्थितीत सकारात्मक जीवनशैली हीच खरी आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचेही प्रा. राजवाळ म्हणाले.
प्रसिद्ध शिवव्याख्याते गणेश ठोकळ यांनी व्याख्यानमालीतील "छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुण पिढी" या विषयावर पहिले पुष्प गुंफले.
सोलापूर येथील प्रसिद्ध लेखिका डॉ. कविता मुरूमकर यांनी "महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता" या विषयावर दुसरे पुष्प गुंफले.
शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तरुणांनी सातत्याने सदविचारांचा आग्रह धरायला हवा. आपल्या पालकांची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम करून जीवनाला आकार देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महेशबापू ढमढेरे यांनी समारोपप्रसंगी केले. थोर व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणेतूनच युवकांनी स्व- कर्तुत्व घडविण्यासाठी सदैव तत्पर असण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला.
प्राचार्य डॉ. अर्जून मुसमाडे आणि उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनीही याप्रसंगी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. दत्तात्रय वाबळे, मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे, डॉ. पद्माकर गोरे, डॉ . सोमनाथ पाटील, डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. रवींद्र भगत, डॉ. अमेय काळे, श्री.सुमेध गजबे, डॉ. विवेक खाबडे, प्रा . अश्विनी पवार, डॉ. प्रमोद पाटील, प्रा. राहूल महाजन, प्रा. आकाश मिसाळ, प्रा. विद्या टुले, प्रा. कांचन गायकवाड, प्रा. किशोर आढाव, प्रा. अविनाश नवले प्रा. केशव उबाळे, प्रा. कल्याणी ढमढेरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.