बॅंड वाजताच थकबाकीदार धास्तावले!!
पुणे - मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने थकबाकीदारांच्या दारात पुन्हा बॅंड वाजवण्यास सुरुवात केली आहे. या बॅंडचा धसका थकबाकीदारांनी घेतला असून तीन दिवसांत महापालिकेचा ९ कोटींचा कर वसूल झाला आहे.
कर न भरणाऱ्या १९ मिळकतींना पालिकेकडून टाळे ठोकण्यात आले आहे. महापालिकेकडे एकूण १४ लाख ८० हजार मिळकतधारकांची नोंदणी असून त्यातील ८ लाख ७३ हजार मिळकतधारकांनी १,७९८ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. तर उर्वरित सह लाख सहा हजार मिळकतधारकांनी तब्बल ९ हजार कोटींचा कर थकविला आहे.*
त्यामुळे वसुलीसाठी पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागास २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २,७२७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, या विभागास आर्थिक वर्ष संपण्यास शेवटचे चार महिने राहिले असताना आतापर्यंत १७९८ कोटींचा कर मिळाला आहे. त्यामुळे कर वसुलीवर प्रशासनाने भर दिला असून, १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर पाच स्वतंत्र बॅंड पथके करून वसुली केली जात आहे.
या पथकाने दि. २ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत १५६ मिळकतींना भेट दिली असून त्यांच्याकडून ९ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. तर १९ मिळकती आतापर्यंत सील करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काही दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.