बांधकामाच्या सेंटरिंग प्लेट चोरणारा बारामती पोलीसांकडून अटक
बांधकाम व्यवसायात सेंटरिंगसाठी लागणा-या ७५ हजार रूपये किंमतीच्या ५० प्लेटा चोरणा-या एकाला बारामती पोलीसांनी अटक केली.
बकुळ्या नकट्या काळे वय - २० रा.मळद ता.बारामती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कसबा जामदार रोड या ठिकाणी बांधकामाची साईट चालू असून त्याठिकाणी बांधकामासाठी सेंटरिंग ला वापरण्यात येणा-या एकूण ५० लोखंडी प्लेट चोरी झाल्या त्याची एकूण किंमत ७५ हजार रूपये असल्याची फिर्याद बाबासाहेब बाबुजी आटोळे वय ३८ रा.मळद रोड बारामती यांनी दिली.
विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी ही कारवाई केली.
दुस-या घटनेत दौंड शहरातील किराणा मालाचे ठोक व्यापारी भक्तू नेवदमल सुखेजा यांच्याकडील १९ लाख ६४ हजार रूपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.
भक्तू नेवदमल सुखेजा वय - ६५ हे नेहमीप्रमाणे त्यांच्या अनिल ट्रेडिंग कंपनी ठोक किराणा मालाच्या दुकानातून दिवसभरात विक्री करून आलेली १९ लाख ६४ हजार रूपयांची रोख रक्कम पिशवीत टाकून पायी घराकडे निघाले होते.
दौंड - सिद्धटेक अष्टविनायक मार्गावरील श्री.सिंधी मंगल कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या पाच तरूणांपैकी एका तरूणाने त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली अन्य चार जण त्याच्या पाठीमागे पळू लागल्यानंतर भक्तू सुखेजा यांनी त्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करताच एका तरूणाने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून पळ काढला. पाचही चोरटे २० ते ३० वयोगटातील असून दौंड पोलीस तपास करत आहेत.