बारामती येथील शिंदे दाम्पत्याचा प्रामाणिकपणा
बारामती येथील शिंदे दाम्पत्याच्या प्रामाणिकपणामुळे हरविलेली बॅग मूळ मालकाला परत मिळाली.
बारामती तालुक्यातील चिरेखानवाडी,मुर्टी येथील माधुरी किसन जगदाळे या को-हाळे बुद्रूक येथून कपडे व किराणा खरेदी करून वडगाव निंबाळकर येथे गेल्या होत्या.
तिथे गेल्यानंतर ऍक्टिव्हा गाडीला अडकवलेली आपली पर्स प्रवासात कुठेतरी पडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याच रस्त्यावरून विठ्ठल सुरेश शिंदे व प्रियांका विठ्ठल शिंदे रा.जामदार रोड, मुक्ती टाऊनशीप ता.बारामती हे दाम्पत्य बारामतीकडे येत असताना त्यांना चोपडज नजिक ही पर्स सापडली. त्यांनी ही पर्स बारामती शहर पोलीस ठाण्यात आणून दिली.
मंगळसुत्र, नेकलेस, कानातील सोन्याचे झुमके, मोबाईल असा जवळपास १ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याकडे सुपुर्द केली.
महाडिक यांनी खात्री पटवून ही पर्स मुळ मालकास परत केली. शिंदे दाम्पत्याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक महाडिक यांनी त्यांचा सत्कार केला.
शिंदे दाम्पत्याने प्रामाणिकपणाचे जे उदाहरण घालून दिलेले आहे त्याचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यावेळी व्यक्त केली.