भरधाव वेगातील कंटेनर पलटी झाल्याने त्याखाली चिरडून मायलेकाचा अंत ; पुणे - नगर महामार्गावरील गव्हाणवाडी येथील घटना
शिरूरच्या मार्केटमध्ये कांदा व भाजीपाला विक्री करून पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे घरी परतणा-या मायलेकाचा पुणे नगर रस्त्यावरील गव्हाणवाडी हद्दीत भरधाव वेगातील कंटेनर दुभाजक तोडून विरूद्ध दिशेला जावून पलटी झाल्याने त्याखाली चिरडून मायलेकाचा अंत झाला.
रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
स्वप्निल उर्फ बंडू बाळू मापारी वय २७ ,लक्ष्मीबाई बाळू मापारी वय ६२ वर्षे दोघेही रा.राळेगणसिद्धी ता.पारनेर अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघा मायलेकराची नावे आहेत.
ते दोघे शिरूर येथील मार्केटमध्ये कांदा व भाजीपाला विक्रीसाठी घेवून आले होते. घाऊक विक्रेत्यांना माल विकल्यावर साडेसहाच्या सुमारास ते दोघे एम एच २२ जी ५१४५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी राळेगणसिद्धी येथे जात होते. शिरूर शहरापासून नगरच्या दिशेने ३ किलोमीटर अंतरावर गव्हाणवाडी नजीक ते गेले असताना नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर क्रमांक एम एच ४६ ए एफ ०२७२ दुभाजक तोडून विरूद्ध बाजूला येवून उलटला . त्याखाली चिरडून लक्ष्मीबाई मापारी व स्वप्निल उर्फ बंडू मापारी या दोघा मायलेकराचा अंत झाला.
अपघातानंतर कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिरूर व रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, मारूती कोळपे, भाऊसाहेब शिंदे, संपत गुंड यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून त्याखाली अडकलेल्या मापारी मायलेकराला बाहेर काढण्यात आले.
पोलीस हवालदार संतोष औटी, प्रफुल्ल भगत, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेष औटी, सुनील हजारे, सुरेश पठारे, गणेश पोटे, विठू गाजरे, बाळासाहेब फटांगरे व स्थानिक तरूणांनी यावेळी मदतकार्य केले.
बेलवंडी पोलीसांनी या अपघाताची नोंद केली असून कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.