भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेईपर्यंत दुकानगाळ्यांचा वापर स्थगित करावा ; शिरूर नगरपालिकेचे राज्य परिवहन पुणे विभाग नियंत्रकांना पत्र
----------------
भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेईपर्यंत दुकानगाळ्यांचा वापर स्थगित करावा अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये आपणाविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जाईल असे शिरूर नगरपरिषदेने राज्य परिवहन पुणे विभाग नियंत्रकांना पत्रान्वये कळविले आहे.
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऍड.प्रसाद बोरकर यांनी राज्य परिवहन पुणे विभाग नियंत्रकांना कळविलेल्या पत्रात असे म्हटले आहे, शिरूर नगरपरिषद हद्दीतील नवीन बसस्थानक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता विनापरवाना बसस्थानक व दुकानगाळ्यांचा वापर सुरू केला असलेबाबत या कार्यालयास महिबूब जैन्नुद्दीन सय्यद उपाध्यक्ष मनसे पुणे जिल्हा यांचे पत्र दिनांक २५/०१/२०२३ दि.२८/०१/२०२३ अन्वये तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. तसेच मा.सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे पत्र दिनांक १३/०२/२०२३ अन्वये मा.सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे पत्र प्राप्त असून प्रस्तूतप्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करणेचे आदेश दिलेले आहेत.
या अनुषंगाने आपणास कळविणेत येते की, दि.९/०१/२०२३ आपणास सदर प्रकरणी पत्र दिलेले असून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेवून त्यानंतरच पुढील वापर सुरू करणेबाबत कळविले आहे. सदर ठिकाणी दुकान गाळ्यांचा वापर सद्यस्थितीत सुरू आहे असे निदर्शनास येते.
या पत्रान्वये आपणास अंतिम सुचना देण्यात येते की, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेईपर्यंत सदर दुकानगाळ्यांचा वापर स्थगित करावा अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा ,नगरपंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६अन्वये आपणाविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जाईल असे पत्रात म्हटले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
शिरूर जि.पुणे