भोर तालुक्यातील नवगुरू इन्स्टिट्यूटमधील २८ विद्यार्धीनींना अन्नातून विषबाधा
पुणे - सातारा महामार्गावरील खोपी ता.भोर येथील फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या परिसरात असलेल्या नवगुरू इन्स्टिट्यूटमधील २८ विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा झाली आहे.
यातील बहुतांश मुली परराज्यातील आहेत. या विद्यार्थिनी नवगुरू इन्स्टिट्यूट मध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनलचे प्रशिक्षण घेत असून २८ विद्यार्थीनींपैकी २२ विद्यार्थीनींवर भोर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सहा विद्यार्थीनी पुणे येथील ससून रूग्णालयात उपचार घेत आहेत.
रविवारी रात्री जेवण केल्यावर सोमवारी सकाळी चार पाच मुलींना पोटदुखीचा व उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोमवारी रात्री पर्यंत अनेक विद्यार्थीनींना त्रास सुरू झाल्याने मंगळवारी त्यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानूसार भोर येथील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात २२ विद्यार्थीनी उपचारासाठी दाखल झाल्या.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनंत साबणे, वैद्मकीय अधिकारी डॉ. लिंगेश्वर बेरूळे यांनी त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे, भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी रूग्णालयात जावून विद्यार्थींनींची विचारपूस केली.