भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्स्प्रेसमधून ८ किलोग्रॅम गाजा जप्त
Raju Tapal
November 14, 2021
60
भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्प्रेसमधून ८ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
कुर्डुवाडी ते दौंड रेल्वेस्थानक दरम्यान धावत्या गाडीत करण्यात आलेल्या कारवाईत दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.
दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, चित्तरंजन मांझी व पपुन रामचंद्र प्रधान दोघेही रा.धनंजयपुर गंजाम,ओडिशा या दोन प्रवाशांना याप्रकरणी ताब्यात घेवून त्यांच्याकडून चार पाकीटात एकूण ८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
कुर्डुवाडी जि.सोलापूर रेल्वे.स्थानकावरून १२ नोव्हेबरला रात्री कोणार्क एक्स्प्रेस दौंडच्या दिशेने रवाना झाल्यावर बी - ६ या डब्यातील दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार जवळकोटे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर कोणार्क एक्स्प्रेस दौंड रेल्वे स्थानक येथे आल्यावर बी -६ मधील प्रवाशांची दौंड लोहमार्ग पोलीस व दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीसांकडून संयुक्तपणे झडती घेण्यात आली. झडतीत दोघांकडे ८ किलोग्रॅम गांजा आढळून आला.
रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल, लोहमार्ग पोलीस दलाचे फौजदार ताराचंद सुडगे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक फौजदार गुजर व मीना यांनी दोघांना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाचा पंचनामा करण्यात आला. सदर गुन्हा कुर्डूवाडी हद्दीत घडल्याने त्यासंबंधी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात येवून पुढील तपासाकरिता कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती युवराज कलकुटगे यांनी पत्रकारांना दिली.
Share This