डाएटमुळे खरंच कॅन्सर बरा होऊ शकतो का?
माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली पत्नी नवज्योत कौर कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाल्याचं जाहीर केलं. हे सगळं पत्नीने पाळलेल्या एका विशेष डाएटमुळे झालं, असा दावा सिद्धू यांनी केलाय.
त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
'आपल्या पत्नीची कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट सुरू होती, किमोथेरपी - रेडिएशन करण्यात आलं होतं, पण बायको वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं, पण डाएटच्या जोरावर तिचा स्टेज 4 कॅन्सर पूर्ण बरा झाला,' असा दावा सिद्धू यांनी केलाय.
फक्त डाएटच्या जोरावर कॅन्सर बरा होऊ शकतो का? सिद्धू यांनी म्हटल्याप्रमाणे हळद, कडुनिंब, तुळशी हे कॅन्सरसाठी मारक ठरू शकतात का?