कारचा धक्का लागून रस्ता ओलांडणा-या विद्यार्थीनीचा मृत्यू
शाळेतून घरी येताना रस्ता ओलांडणा-या विद्यार्थीनीचा कारचा धक्का लागून मृत्यू झाला.
तनिष्का नवनाथ ढोबळे वय ९ वर्षै जारकरवाडी असे कारचा धक्का लागून मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव असून जारकरवाडी ता.आंबेगाव गावाच्या हद्दीतून जाणा-या लोणी - मंचर रस्त्यावर क्रेटा कारचा धक्का लागून या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
तनिष्का नवनाथ ढोबळे हिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी येथून भाऊसाहेब गोविंद लबडे यांनी त्यांच्या पिकअप जीपमध्ये घेवून मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घोडकाना वस्तीजवळ तनिष्काच्या घराजवळ आल्यानंतर श्री. लबडे यांनी त्यांची पिक अप गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून तनिष्काला गाडीतून खाली उतरविले.
नंतर ती त्यांच्या गाडीच्या पाठीमागून जावून घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी गेली असता मंचर बाजूकडून लोणी बाजूकडे जाणा-या एम एच १४ एच क्यू ८१९९ ह्यंडाई क्रेटा कारच्या आरशाची तनिष्काच्या डोक्यास ठोस बसून डोक्यास गंभीर दुखापत होवून तिचा मृत्यू झाला.
नवनाथ महादू ढोबळे यांच्या फिर्यादीवरून पोलीसांनी क्रेटा चालक शरद बन्सी थोरवे रा.शिरोली बुद्रूक ता.जुन्नर यांच्याविरूद्ध मंचर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.