भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जातनिहाय जनगणना सुरू होणार
नवी दिल्ली :- भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. यावेळी जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात केली जाईल. तर, देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना केली जाईल. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम (स्तंभ/रकाना) समाविष्ट करण्यात आला आहे.
जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घरांत जाऊन लोकांची माहिती गोळा करतील. यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे. जातनिहाय लोकसंख्या जाणून घेणे, समाजातील विविध वर्गांची स्थिती जाणून घेणे हे त्यामागचं प्रमुख उद्दीष्ट आहे.
भारतात २०११ साली शेवटची जनगणना करण्यात आली होती. तत्पूर्वी, दर १० वर्षांनी देशात जनगणना केली जात होती. त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना करणे अपेक्षित होते. गेल्या पाच वर्षांपासून विरोधी पक्षांनी, प्रामुख्याने काँग्रेस व खासदार राहुल गांधी यांनी जनगणनेची मागणी लावून धरली. त्यांनी जातनिहाय जनगणनेवर जोर दिला. अखेर केंद्र सरकारने जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.२०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी इतकी होती. तर २००१ च्या जनगणनेनुसार देशात १०२ कोटी लोक होते. दरम्यान, आता २०२६ - २०२७ मध्ये जनगणना केली जाणार असून जनगणनेचं चक्र बदललं जाईल असे म्हटले जात आहे.